महिला किसान दिनानिमित्त नंदुरबारात 30 महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:44 PM2018-10-21T12:44:49+5:302018-10-21T12:44:55+5:30
कृषी विज्ञान केंद्र : शेती क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची दखल
नंदुरबार : महिलांची शेती क्षेत्रातील भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने महिला किसान दिन देशभर करण्याचे निश्चित केले. त्यानुसार डॉ.हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे महिला किसान दिन साजरा झाला. त्यानिमित्त जिल्ह्यातील 30 प्रयोगशील महिला शेतक:यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, उपजिल्हाधिकारी डॉ.अर्चना पठारे, नाबर्डचे सहायक महाप्रबंधक प्रमोद पाटील, डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, लोकमंगल प्रतिष्ठानच्या सचिव अनिता ढोबळे, शहादा जायण्टस् सहेलीच्या अध्यक्षा संगीता पाटील, महिला बालविकास अधिकारी सुजाता बोरसे, भारतीय स्त्री शक्तीच्या संघटन प्रमुख कल्याणी डांगे, प्रयोगशील शेतकरी आशाबाई राजपूत, डॉ.हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त ललीत पाठक उपस्थित होते.
रजनी नाईक म्हणाल्या की, शेतातील बहुतांश कामांमध्ये महिलांचा सहभाग असतो. शेतातील कष्टदायक कामे महिलाच प्राधान्याने करतात. त्यामुळे महिलांच्या योगदानाची दखल घेऊन प्रयोगशील महिलांना सन्मानीत करण्याचा कृषी विज्ञान केंद्राने आयोजित सोहळा प्रशंसनीय असल्याचे त्या म्हणाल्या.
उपजिल्हाधिकारी डॉ.पठारे म्हणाल्या की, महिला आता प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करीत आहेत. घरसंसाराची कामे सांभाळून शेतकरी महिला उत्कृष्टपणे शेती व शेतीपूरक व्यवसायात जबाबदार पार पाडत आहेत. अशा महिला शेतक:यांचे त्यांनी कौतुक केले. अनिता ढोबळे यांनी ‘महिला उद्योजकता’, सुजाता बोरसे यांनी ‘महिलांचे सुपोषण’, कल्याणी डांगे यांनी ‘भारतीय परंपरा व महिला’ या विषयांवर प्रकाश टाकला. संगीता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रामीण महिलांना एक चांगला आर्थिक स्त्रोत म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकतो याचे विवेचन बलदाणे येथील बचत गटाच्या प्रमुख आशाबाई राजपूत यांनी केले. कृष्णदास पाटील, ललीत पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ आर.एम. पाटील, पी.सी. कुंदे, यु.डी. पाटील, डॉ.महेश गणापुरे, आर.आर. भावसार, विजय बागल, गीता कदम, राहुल नवले, कल्याण पाटील, रजेसिंग राजपूत, किरण मराठे, कैलास सोनवणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी केले. या कार्यक्रमात रुरल फाऊंडेशन, जनसेवा फाऊंडेशन, एकलव्य आदिवासी विकास मंडळ कंजाला या संस्थांनीही सहभाग घेतला.