धडगाव तालुक्यात ५५ मतदान केंद्रांसाठी ३१० कर्मचारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:26 AM2021-01-15T04:26:51+5:302021-01-15T04:26:51+5:30
धडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी ९ वाजल्यापासून मतदान यंत्र व साहित्य वाटपाला प्रारंभ झाला होता. यावेळी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, ...
धडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी ९ वाजल्यापासून मतदान यंत्र व साहित्य वाटपाला प्रारंभ झाला होता. यावेळी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, नायब तहसीलदार राहुल मुळीक, नायब तहसीलदार अमोल पाटील आदी उपस्थित हाेते.
तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या एकूण ५५ प्रभागात मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या ५५ प्रभागात निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यातून अंतिम मुदतीत एकूण ४१६ अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी ७९ जणांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर एकूण ३३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या उमेदवारांचा प्रचार बुधवारी थंडावला. दरम्यान, तालुक्यातील धनाजे आणि भोगवाडे येथील प्रत्येकी दोन असे चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत. एकूण २५ हजार मतदार मतदानासाठी सज्ज झाले आहेत. यामध्ये १३ हजार ९२ पुरूष, तर १२ हजार ६६० महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात तयार करण्यात आलेल्या ५५ मतदान केंद्रांसाठी ६२ पथके तैनात करण्यात आली आहेत. यातून ३१० कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रात पाच पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रांसाठी सात पोलीस अधिकारी, ११४ पोलीस काॅन्स्टेबल, गृहरक्षक दलाचे ४५ जवान तैनात करण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांनी मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे.
दरम्यान, तालुक्यातील घाटली, काकडदा, मुंदलवड, धनाजे बु्द्रुक येथील मतदान केंद्र संवेदनशील असल्याने गैरप्रकार टाळण्यासाठी त्याठिकाणी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वच कर्मचारी व मतदारांनी योग्य ती खबरदारी घेत सामाजिक अंतर राखून तोंडाला मास्क लावून मतदान केंद्रावर यावे. मतदान केंद्रावर आल्यावर योग्य काळजी घ्यावी व मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडणार नाही, याचे भान राखावे, असे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी कळवले आहे.
मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. ते टाळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, सर्वच मतदान केंद्रांवर आमचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संवेदशील गावांत अधिक सुरक्षा पुरविण्यात आली असून, सर्वच केंद्रांवर आमची टीम नजर ठेवून असेल, मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावावा, असे धडगावचे पोलीस निरीक्षक दिलीप महाजन यांनी कळवले आहे.