शहादा तालुका विज्ञान प्रदर्शनात 325 उपकरणांची मांडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:42 AM2018-12-21T11:42:51+5:302018-12-21T11:42:56+5:30
शहादा : शहरातील श्री महावीर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आवारात तालुका विज्ञान प्रदर्शनात एकूण 325 उपकरणांचा समावेश होता. प्रदर्शनाचे उद्घाटन ...
शहादा : शहरातील श्री महावीर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आवारात तालुका विज्ञान प्रदर्शनात एकूण 325 उपकरणांचा समावेश होता. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.वसंत पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री महावीर चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन रमेश आसकरण जैन होते.
शहादा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, श्री महावीर इंग्लिश मिडीयम स्कूल व शिक्षण विभाग पंचायत समिती शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान नगरीत हे प्रदर्शन भरविण्यात आले. या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम, शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, पं.स. सभापती दरबारसिंग पवार, गटशिक्षणाधिकारी ए.डी. पाटील, प्राचार्य ए.एम. पाटील, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयदेव पाटील, संस्थेचे संचालक अनिल गांधी, समीर चोरडिया, केंद्रप्रमुख एस.आर. आहिरे, जी.एस. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी ममता पाटील, एम.एस. बंजारा, डोंगरगावचे उपसरपंच विजय पाटील व विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
डॉ.वसंत पाटील म्हणाले की, विज्ञानाची आवड विद्यार्थी दशेतच निर्माण झाली पाहिजे. नैतिक मूल्यमापन व निदान करून जीवन यशस्वीतेसाठी त्याचा उपयोग करावा. विज्ञान प्रदर्शनातून आरोग्य, स्वच्छता, संपत्ती यांची सुरक्षितता ठेवण्याचे काम केले पाहिजे, असे सांगितले. शिक्षणाधिकारी कदम म्हणाले की, आपले जीवनमान उंचाविण्यासाठी पृथ्वीचे संरक्षण होणे काळाची गरज आहे. संत गाडगेबाबा यांचे स्वच्छतेचे विचार काळाची गरज आहे. विज्ञानामुळे जेवढे सुख आले आहे त्याचसोबत माणूसही आळशी झाला आहे. विज्ञानाचा प्रचार-प्रसार नसल्याने अंधश्रद्धेला अनेक लोक बळी पडत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयदेव पाटील यांनी केले. तालुका विज्ञान प्रदर्शनात ‘जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय’ हा मुख्य विषय आहे. आरोग्य व स्वच्छता, संसाधन आणि व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन वाहतूक आणि दळणवळण, गणिते प्रकृती आदी विषयांना अनुसरून प्राथमिक गटात 152, आदिवासी गटात नऊ, शिक्षक गटात दोन व परिसर गटात एक, माध्यमिक गटात 149, आदिवासी गटात दोन, शिक्षक गटात एक व परिसर गटात एक असे एकूण 325 उपकरणे मांडली आहेत. सूत्रसंचालन गणेश चौधरी यांनी तर आभार शारदा कुलकर्णी यांनी मानले.