आगीत होरपळून 35 जनावरांचा मृत्यू माळखुर्द येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:01 PM2017-10-30T12:01:06+5:302017-10-30T12:01:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : गोठय़ात लावलेल्या चिमणीचा भडका उडून लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. गोठय़ात बांधलेली 35 जनावरे या आगीत मृत्युमुखी पडले. याशिवाय 32 हजारांची रोकडसह 90 क्विंटल धान्य व संसारोपयोगी वस्तू जळाल्यात. साधारण पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत मानवहानी झाली नाही. ही घटना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील माळखुर्द या पाडय़ात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील माळखुर्द या पाडय़ातील फुलसिंग रामा वसावे यांच्या घराजवळील गोठय़ात रात्री चिमणी लावली होती. या चिमणीचा भडका रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उडाला. त्यात आगीने पेट घेतल्याने गोठय़ा बरोबरच घराला आग लागली. या आगीत संपूर्ण गोठा व घरही जळून खाक झाले. या वेळी गोठय़ात बांधलेली चार बैले, एक दुधाळ गाय, एक गो:हा, 15 शेळ्या, 15 कोंबडय़ा अशी 35 पाळीव जनावरे त्याच बरोबर 90 क्विंटल धान्य. यात भगर, ज्वारी, भुईमूग, तुवर दाळीचा समावेश होता. याशिवाय कपाटात ठेवलेली 32 हजारांची रोकड व संसारोपयोगी वस्तूही जळून खाक झाल्या आहे.
शेतात एकांतात घर असल्यामुळे आजू-बाजूचे रहिवाशी आग विझविण्यास येईपावेतो संपूर्ण पाळीव प्राणी आगीच्या भस्मात मृत्यूमुखी पडले होते. सुदैवाने या दुर्घटनेत मुनष्यहाणी झाली नाही. मात्र आपल्या डोळ्यादेखत मोठय़ा कष्टाने कमवलेली कमाई अन् पाळीव जनावरे आगीत भस्म झाल्याने फुलसिंग वसावे यांनी अक्षरश: हंबरडा फोडला होता. त्यांचा संसार उघडय़ावर आल्याने शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.