नंदुरबार जिल्ह्यात पावसाने चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By मनोज शेलार | Published: March 18, 2023 07:43 PM2023-03-18T19:43:38+5:302023-03-18T19:43:48+5:30
दरम्यान, शनिवारी दुपारी थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला गारपीट झाली.
नंदुरबार : गेल्या १२ दिवसांत चार वेळा झालेल्या पावसाने आणि दोनवेळच्या गारपिटीने जिल्ह्यातील चार हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात दोन हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले होते. गेल्या तीन दिवसातील पावसात व गारपिटीत देखील दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला गारपीट झाली. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अर्थात ६ मार्च रोजी गारपीट आणि पाऊस झाला होता. त्यानंतर १३ मार्चपासून दररोज तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. १७ मार्च रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १२ दिवसांत जवळपास चार हजार हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसान झाले. दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे.