एकाच दिवशी ४७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 09:18 PM2020-07-05T21:18:19+5:302020-07-05T21:18:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकाच दिवशी तब्बल ४७ जण कोरोनामुक्त होण्याचे सकारात्मक चित्र पहिल्यांदाच रविवारी अनुभवण्यास मिळाले. जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकाच दिवशी तब्बल ४७ जण कोरोनामुक्त होण्याचे सकारात्मक चित्र पहिल्यांदाच रविवारी अनुभवण्यास मिळाले. जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षातील २४ जण तर एकलव्य शासकीय वसतिगृहातील कोविड कक्षातील २३ जणांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील गेल्या आठवड्यात आढळलेले कोरोनाग्रस्त सर्वच १७ कर्मचारीदेखील कोरोनामुक्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आकडा आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा रेट ६५ टक्क्यांवर पोहचला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा द्विशतकाच्या जवळ पोहचला आहे. रविवावरी आढळलेल्या १० रुग्णांमुळे हा आकडा १९० पर्यंत गेला आहे. त्यामुळे एकीकडे चिंतेचे वातावरण असतांना दुसरीकडे कोरोनामुक्तीचा सुखद धक्कादेखील मिळाला. एकाच दिवसात तब्बल ४८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. यातील अनेक रुग्ण हे १० ते १६ दिवसांचा उपचार करून घरी परतत आहेत. सर्वाधिक रुग्ण हे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आहेत.
१७ कर्मचाऱ्यांना दिलासा
जिल्हा रुग्णालयातील एकाच वेळी १८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्या आधीही काही कर्मचारी आढळले होते. त्या सर्वांवर कोविड कक्षात उपचार सुरू होते. आता त्यातील १७ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. आता जिल्हा रुग्णालयातील रविवारी आढळलेला केवळ एकच कर्मचारी उपचार घेत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
एकाच वेळी एव्हढे कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण होते. जिल्हा रुग्णालयातील एकुण कारभाराविषयीदेखील चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर मात्र अगदीच तुरळक स्वरूपात कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले होते.
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण
डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयातील १७, गिरिविहार कॉलनी नंदुरबारातील सात, सैताणे, ता.नंदुरबार येथील ९, नंदुरबारातील मंगळबाजारातील सात, वृंदावन कॉलनीतील एक, ज्ञानदिप सोसायटी दोन, सिंधी कॉलनी एक, शहाद्यातील गणेशनगर, तळोद्यातील खान्देशी गल्लीतील प्रत्येकी एक अशा ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
लक्षणे नसलेले सर्वाधिक
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले सर्वाधिक होते. त्यामुळे लक्षणे असलेले व लक्षणे नसलेले रुग्ण असे दोन गट पाडण्यात आले. लक्षणे असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयातीलच कोविड कक्षात उपचार करण्यात आले तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना नव्याने तयार केलेल्या एकलव्य निवासी इंग्रजी शाळेच्या वसतिगृहातील कोविड कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संक्रमणाचा धोका देखील बºयाच प्रमाणात टळला. त्यातून कोरोनामुक्तचा आकडा वाढला.
आकडा गेला सव्वाशेपर्यंत
कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा आता जवळपास १२४ पर्यंत पोहचला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये आतापर्यंत चार वर्षीय बालिकेपासून ते ७० वर्ष वयापर्यंतच्या वृद्धाचा देखील समावेश आहे. रविवारी २८ जणांना डिस्चार्ज दिला गेला त्यातील बहुमतेक जण हे २० ते ४५ वयोगटातील आहेत. यामुळे समधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १९० कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२४ पेक्षा अधीकजण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५७ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
गेल्या काही दिवसात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांचा अधीक समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर ते देखील पॉझिटिव्ह झाले. तसा अहवाल त्यांचा आला. परंतु लक्षणे नव्हती. त्याचा दुसरा अहवाल घेतला तर तो निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.
४ही बाब लक्षात घेता जिल्हा रुग्णालयाने लक्षणे असलेली व नसलेली रुग्ण असे दोन भाग करण्याचे ठरविले. त्यानुसार दुसरे कोविड सेंटर देखील सुरू केले. ही विभागणी केल्यानंतर कोरोनामुक्तीचा आकडा देखील झपाट्याने वाढला.
रविवारी आलेल्या २५ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १० अहवाल पॉझिटिव्ह तर १५ अहवाल निगेटिव्ह आले. असे असूनही अद्यापही १२४ अहवालांची प्रतीक्षा कायम आहे.
रविवारी दिवसभरात एकुण ४५ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात आज आलेल्या पॉझिटिव्हच्या संपर्कातील तसेच जिल्हा रुग्णालय कर्मचाºयांच्या स्वॅबचा समावेश आहे.
सोमवारी सायंकाळपर्यंत काही स्वॅबचे अहवाल मिळणे अपेक्षीत आहे.