९० दिवसांत ५२ बालके दगावली, ४०९ तीव्र कुपोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 09:25 AM2022-07-26T09:25:39+5:302022-07-26T09:26:21+5:30
४०९ तीव्र कुपोषित, आहारासाठी खटाटोप
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा (जि. अमरावती) : कुपोषणाने ग्रासलेल्या मेळघाटात अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५२ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे.
मृतांमध्ये उपजत १७ आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३५ बालकांचा समावेश आहे. तीव्र कुपोषणाने ४०९ बालके पीडित आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील या बालकांना वाचविण्यासाठी अंगणवाडी केंद्रांमधून अमायलेजयुक्त पोषण आहार देण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली, त्याच दिवशी आदिवासी भागा हे वास्तव पुढे यावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते.
धारणी व चिखलदरा तालुक्यांत न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत दोन्ही तालुक्यांत ४२५ पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रांतून स्तनदा, गर्भवती माता व शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार शिजवून दिला जातो.
जलजन्य आजाराची लागण होऊन कमी होणारे वजन आणि विविध आजारांनी मृत्यू पाहता मेळघाटातील बालकांची पावसाळ्यात अत्यंत जोखीम असते.
धारणी व चिखलदरा तालुक्यांत कुपोषणाच्या तीव्र श्रेणीतील सॅममध्ये एप्रिल, मे महिन्यांत २१३ बालकांचा समावेश होता. जून महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात हा आकडा ४०९ झाला आहे. तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ३७५६ बालकांसाठी १ ते ३० जुलैदरम्यान पेसा कायद्यांतर्गत व्हीसीडीसी उघडण्यात आले आहे.
उपजत १७ बालके दगावली
सर्वसाधारण श्रेणीत ३२,५७६ व मॅममध्ये ३,३४७ बालके आहेत. ३,८२० गरोदर व ३,४१० स्तनदा माता आहेत.
तीन महिन्यांत उपजत आणि शून्य ते सहा वयोगटातील ५२ बालकांचा मृत्यू झाला. गतवर्षीपेक्षा १५ ने हा आकडा कमी आहे. पावसाळ्याचे दिवस पाहता आरोग्य सुविधा, आहार पुरविला जात आहे.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी