नंदुरबारातील एकाच घरातून ५५ मोबाईलची चोरी
By Ravalnath.patil | Published: April 4, 2023 05:46 PM2023-04-04T17:46:53+5:302023-04-04T17:47:03+5:30
शहरातील चिराग गल्लीतील बंद घरातून दोघांनी रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि ५५ मोबाईल चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
नंदुरबार :
शहरातील चिराग गल्लीतील बंद घरातून दोघांनी रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि ५५ मोबाईल चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. जुनेद रजा रसूल यांच्या चिराग गल्लीतील महेबूब मंजील या घरात चोरीची ही घटना घडली आहे. मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करणारे जुनेद रसूल हे २८ फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशात नातेवाईकाच्या विवाहानिमित्त गेले होते.
तब्बल एक महिन्यानंतर २८ मार्च रोजी रसूल हे परत आले होते. दरम्यान त्यांच्या घराचा कडीकोंयडा तोडून घरातील ९० हजार रुपये रोख, १८ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २ हजार रुपयांची भांडी सोबत दुरुस्तीसाठी आलेले ३० अँड्राईड आणि २५ साधे मोबाईल असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले. यातून त्यांनी पोलीसात धाव घेतली. दरम्यान त्यांच्या घराच्या परिसरात चिराग गल्लीतीलच दोघे ये-जा करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली होती. यातून जुनेद रसूल यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चिरागगल्लीतील दाेघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी संशयितांचा शोध घेतला असता, दोघेही फरार असल्याची माहिती आहे.