नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथे भगर खाल्याने ७५ जणांना विषबाधा
By मनोज शेलार | Published: March 8, 2024 10:12 PM2024-03-08T22:12:52+5:302024-03-08T22:12:59+5:30
४० जणांवर रनाळे ग्रामिण रुग्णालयात तर उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नंदुरबार: महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी केेलेल्या भगरीच्या फराळातून तालुक्यातील घोटाणे येथे ७५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ४० जणांवर रनाळे ग्रामिण रुग्णालयात तर उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, तालुका आरोग्य विभागाकडून गावात रात्रीच सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयाचे पथक घोटाणे व रनाळे येथे तळ ठोकून आहेत.
घोटाणे येथे गावातील रहिवाशांनी एका ब्रॅण्डची भगर फराळसाठी खरेदी केली होती. भगर खाल्यानंतर सायंकाळी अनेकांना त्रास जाणवू लागला. अनेकांना मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास होत होता. यामुळे तात्काळ रनाळे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांनी धाव घेतली. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक नरेश पाडवी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.
रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे ७५ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, यातील ४० जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते तर ५ ते ६ वृद्धांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. रात्री जिल्हा रुग्णालयाच्या पथकासह तालुका आरोग्य विभागाचे पथक रनाळा तसेच घोटाणे येथे तळ ठोकून होते. दरम्यान गावात आरोग्य विभागाकडून सर्वे करण्यात येत होता. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.नरेश पाडवी यांनी दिली. याबाबत स्थानिक पोलिस यंत्रणेला देखील माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महाशिवरात्रीपूर्वी गावांमध्ये देण्यात आली होती दवंडी
गेल्या महिन्यात रनाळे येथे एका कार्यक्रमात भगरमधून भाविकांना विषबाधा झाल्याने आरोग्य प्रशासन यावेळी सतर्क झाले होते. यामुळे गावांमधून यापूर्वीच 'भगरपासून सावधान' असे सांगत दवंडी देवून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते.