सातपुड्यातील शर्यतीत धावणार 80 अश्व; काठी संस्थानिकांचा दसरा उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 07:28 AM2024-10-13T07:28:44+5:302024-10-13T07:29:18+5:30

काठी हे सातपुड्यातील संस्थानिकांचे गाव. येथील संस्थानिकांच्या वारसदारांनी आजही पूर्वजांची परंपरा सुरू ठेवली आहे. विशेषत: येथील दसऱ्याची परंपरा ही आगळी आहे.

80 horses will run in the race in Satpura; Dussehra of Kathi institutions in excitement | सातपुड्यातील शर्यतीत धावणार 80 अश्व; काठी संस्थानिकांचा दसरा उत्साहात

सातपुड्यातील शर्यतीत धावणार 80 अश्व; काठी संस्थानिकांचा दसरा उत्साहात

मोलगी (नंदूरबार) : काठी संस्थानची दसऱ्याची परंपरा गेल्या साडेबाराशे वर्षांपासून कायम असून, या वर्षीही दसऱ्याच्या निमित्ताने येथे हजारोंच्या उपस्थितीत अश्व स्पर्धांना सुरूवात झाली. एकूण ८० स्पर्धकांनी त्यात सहभाग घेतला असून, पहिल्या दिवशी २३ फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा दोन दिवस सुरू राहणार आहे. 

काठी हे सातपुड्यातील संस्थानिकांचे गाव. येथील संस्थानिकांच्या वारसदारांनी आजही पूर्वजांची परंपरा सुरू ठेवली आहे. विशेषत: येथील दसऱ्याची परंपरा ही आगळी आहे. त्यानिमित्ताने सातपुड्यातील पंचक्रोशितील हजारो नागरिक एकत्र येवून दसऱ्याचा आनंद लुटतात. दसऱ्यानिमित्त येथे घोड्यांच्या शर्यतींची परंपरा आहे. त्यासाठी सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यातून उमदे घोडे या स्पर्धेसाठी येतात. काठी-मोलगी रस्त्यावरच या स्पर्धा होतात. मध्यंतरी स्पर्धकांची संख्या कमी झाली होती. मात्र अलीकडे ही संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे स्पर्धा दोन ते तीन दिवस चालतात. 

यंदाच्या स्पर्धेसाठी ८० अश्वांची नोंदणी झाली आहे. स्पर्धा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. काठी-मोलगी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी तर डोंगरावर बसून नागरिकांनी या स्पर्धा पाहिल्या. 

पहिल्या दिवशी २३ अश्वांच्या फेऱ्या
खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांसह काठी संस्थानिकांचे वारसदार रंजीत पाडवी, राजेंद्र पाडवी, बहादूरसिंग पाडवी, गणपतसिंग पाडवी, करणसिंग पाडवी आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी २३ अश्वांच्या फेऱ्या झाल्या. अतिशय जल्लोष आणि उत्साहात या स्पर्धांना सुरूवात झाली.
 

Web Title: 80 horses will run in the race in Satpura; Dussehra of Kathi institutions in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा