नंदुरबारात 82 नवीन योजनेची कामे संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:53 AM2018-12-13T11:53:41+5:302018-12-13T11:53:45+5:30
पाणी पुरवठा योजना : 83 गावांना मिळणार लाभ, दुष्काळात दिलासा
नंदुरबार : यंदाच्या दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर मंजुर करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजनेअंतर्गत 83 गावांच्या 82 पाणीपुरवठा योजनांना गती देण्याची मागणी होत आहे. यासाठी 32 कोटी 74 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून 16 गावाच्या योजनांसाठी सात कोटी 12 लाख रुपये देखील मंजुर केले आहेत.
जिल्ह्यात यंदा दुष्काळाची धग मोठी आहे. त्यामुळे यापूर्वीच्या अपुर्ण पाणी पुरवठा योजनांना गती देण्यासह नवीन योजना मार्गी लावाव्या यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पाठपुरवा करण्यात आला होता. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी या योजनांअंतर्गत निधी मंजुर केला आहे.
यासाठी नंदुरबार जिल्ह्याचा पाणी पुरवठा आराखडा तयार करून तो पाठविण्यात आला होता. 2018-19 चा जिल्ह्याचा आराखडा काही दिवसांपूर्वीच मंजुर करण्यात आला. या आराखडय़ामध्ये पालकमंत्र्यांनी सुचविलेल्या योजनांचा विचार करण्यात आला आहे. या वर्षी जिल्ह्यातील 83 वाडय़ा-वस्त्यांसाठी 82 योजनांचा समावेश राहणार आहे. एकुण 32 कोटी 74 लाख रुपये त्यासाठी खर्च अपेक्षीत आहे. या आराखडय़ामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी 15 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. नवीन व चालू असणा:या 84 गावे, वाडय़ासाठी 83 योजनांकरीता 33 कोटी 89 लाख रुपयांचा आराखडाही यापूर्वीच मंजुर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून 16 गावांसाठी 16 योजना मंजुर केल्या असून त्यासाठी सात कोटी 12 लाख रुपये निध उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील पाणी पुरवठा सुयोग्य रितीने होण्यासाठी व जिल्ह्यातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी याच योजनांच्या माध्यमातून उपाय योजनांना मार्गी लावण्यात येणार आहे. तीन वर्षापूर्वी अर्थात 2015 मध्ये केंद्र शासनाने राज्यातील पाणी पुरवठय़ाच्या अपुर्ण योजनांची संख्या पहाता राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजनेत नवीन योजना घेण्यावर काही काळापुरती स्थगिती दिली होती.
तालुकानिहाय मंजुर योजना, गावांची संख्या व अंदाजीत रक्कम पुढील प्रमाणे : अक्कलकुवा तालुक्यातील 18 गावे व 17 योजनांसाठी 10 कोटी 50 लाख रुपये. धडगाव तालुक्यातील 13 गावे व 13 योजनांसाठी दोन कोटी 36 लाख रुपये. नंदुरबार तालुक्यातील 22 गावांमधील 22 योजनांसाठी 12 कोटी 25 लाख रुपये. नवापूर तालुक्यातील 15 गावांमधील 15 योजनांसाठी चार कोटी 15 लाख, शहादा तालुक्यातील 10 गावांमधील दहा योजनांसाठी दोन कोटी 89 लाख तर तळोदा तालुक्यातील पाच गावांच्या पाच योजनांसाठी 56 लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे.
याच अनुषंगाने मागील तीन वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्य हगणदारीमुक्तही जाहीर करण्यात आले आहे. हगणदारीमुक्तीसाठी गावांमध्ये झालेल्या शौचालयाच्या बांधकामासाठी उर्वरित आवश्यक निधी चार कोटी 94 लाख रुपये देखील यापूर्वीच मंजुर करण्यात आला आहे.