64 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्केे मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 01:12 PM2021-01-16T13:12:33+5:302021-01-16T13:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ८२.६८ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ८२.६८ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला होता. सकाळपासून कायम असलेला मतदानाचा उत्साह सायंकाळपर्यंत कायम होता. सर्वाधिक ८७ टक्के मतदान हे नवापूर तर सर्वाधिक कमी ६४ टक्के मतदान हे धडगाव तालुक्यात टक्के झाल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरु करण्यात आला होता. माघारीअंती २३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यातील १३६ सदस्यपदे बिनविरोध झाल्याने ५३९ सदस्यपदाच्या जागांसाठी पाच जानेवारीपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. १३ रोजी प्रचाराला विराम देण्यात आल्यानंतर १४ रोजी राखीव दिवस होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर केंद्रांवर उत्तरोतर मतदारांचा प्रतिसाद वाढता राहिला होता. सायंकाळी साडेपाचपर्यंत ७७ टक्के मतदान झाल्यानंतर एकूण १ हजार २२९ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद झाले. १८ रोजी तहसील कार्यालयस्तरावर मतमोजणी होणार असल्याने त्याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान सकाळपासून सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक कर्मचा-यांसोबत आरोग्य कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक मतदान केंद्रावर आशा सेविका, आरोग्य सेविका यांची नियुक्ती होती. त्यांनी मतदानासाठी येणा-यांचे थर्मल स्कॅनिंग करुन मतदारांना प्रवेश दिला. मतदारांना सॅनेटायझर लावण्यासह हात धुण्यासाठी पाणी देण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवत मतदान करण्याच्या सूचना करण्यात आल्यानंतरही सुविधा नसल्याने ते होवू शकले नाही. दरम्यान जिल्ह्यातील सर्व २१५ मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दिवसभर मतदानाचा आलेख चढता
- जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी सकाळी मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ७.३० ते ९.३० या वेळेत एकूण १२ टक्के मतदान झाले होते. १ लाख ११ हजार २३६ मतदारांपैकी १४ हजार ११३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात ६ हजार १४९ महिला तर ७ हजार ९६४ पुरूषांनी मतदान केले होते.
- दरम्यान या मतदारांच्या आकडेवारीत वाढ होवून सकाळी साडेअकरापर्यंत ३१ टक्के मतदान झाले होते. एकूण ३५ हजार २४९ मतदारांनी मतदान पूर्ण केले होते. यात १८ हजार २३६ स्त्री तर १८ हजार २३६ पुरूष मतदारांनी हक्क बजावला होता. सकाळी १० पासून हळूहळू मतदान केंद्रांवर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती.
- दुपारी दीड वाजेपर्यंत मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. तब्बल २६ हजार ९५४ स्त्री तर २५ हजार १३८ पुरूष मतदारांनी मतदान केले होते. एकूण ४६ टक्के मतदान हे दुपारी दीडपर्यंत पूर्ण झाले होते. १ लाख ११ हजारपैकी ५२ हजार ९२ मतदारांनी मतदान केले. धडगाव तालुक्यातील केंद्रांवरही दुपारी गर्दी होण्यास प्रारंभ झाला होती.
- दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानात आणखी वाढ होवून ते ६६ टक्क्यांपर्यंत होते. दुपारी १२ नंतर ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह वाढला होता. यातून ७३ हजार ९६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात ३७ हजार स्त्री तर ३८ हजार पुरूषांनी मतदान केल्याची माहिती देण्यात आली आहे. सायंकाळी मुदत संपल्यानंतरही अनेक जण केंद्रात हजर असल्याने साडेसहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
मतदान टक्केवारी
- नंदुरबार तालुक्यात सात ग्रामपंचायतींसाठी ८२. ४७ टक्के.
- नवापूर ताुलक्यात १२ ग्रामपंचायतींसाठी ८७.६ टक्के.
- अक्कलकुवा तालुक्यात एका ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के.
- तळोदा तालुक्यात सात ग्रामपंचायतींसाठी ७९.२३ टक्के.
- शहादा तालुक्यात २१ ग्रामपंचायतींसाठी ७३.०६ टक्केे
- धडगाव तालुक्यात २२ ग्रामपंचायतींसाठी ६९. ४८ टक्के मतदान झाले आहे.
जिल्हाधिकारींची भेट
- मतदान प्रक्रिया सुरु असताना जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी कोपर्ली, हाटमोहिदे आणि भालेर येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
- भेटीदरम्यान जिल्हाधिकारी डाॅ. भारुड यांनी केंद्रांची पाहणी केली. तसेच मतदारांसाठी कोविड नियमांनुसार केलेल्या सुरक्षा उपायांचा आढावा घेतला.
सुविधांवर भर
- सर्व २१५ मतदान केंद्रांवर कोविड नियमांनुसार सुविधा देण्यात आल्या होत्या. सोबत वृद्ध व चालू न शकणा-या दिव्यांग मतदारांना व्हील चेअर देण्यात आल्या होत्या.
- मतदान केंद्रांवर क्वारंटाईन तसेच कोरोनाबाधितांना मतदान करता येणार होते. परंतू प्रशासनाकडे अद्याप आकडे आलेले नाहीत.
काही ठिकाणी तुरळक वाद दरम्यान नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे मतदान केंद्र परिसरात जाण्यावरुन काही उमेदवार व पोलीस अधिकारी यांच्यात किरकोळ वाद झाले होते.