८८ लाखांची गुरे व साडेआठ लाखांची वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:40+5:302021-09-25T04:32:40+5:30
नंदुरबार : चिखली, ता. शहादा व डामरखेडा, ता. शहादानजीक पोलिसांनी कारवाई करून गुरांची अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल केला. ...
नंदुरबार : चिखली, ता. शहादा व डामरखेडा, ता. शहादानजीक पोलिसांनी कारवाई करून गुरांची अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल केला. दोन्ही घटना मिळून एकूण ८८ लाख रुपयांची गुरे जप्त करण्यात आली असून साडेआठ लाखांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीस सूत्रांनुसार, चिखली, ता. शहादानजीक दोन बोलेरो वाहनांतून अवैधरीत्या गुरांना कोंबून वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. लागलीच कारवाई करून दोन्ही वाहने (क्रमांक एमएच १८-एए ६०४९ व एमएच ०४-जीसी ४२२४) जप्त करून तपासली असता त्यात ६८ हजार रुपयांची दहा गुरे आढळून आली. पोलिसांनी गुरांसह साडेसहा लाखांची दोन वाहने जप्त केली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सुभाष वसावे यांनी फिर्याद दिल्याने रईस मजीद तेली व हाफीज मजीद तेली, (रा. शिरपूर) यांच्याविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार खंडू धनगर करीत आहेत.
दुसरी घटना प्रकाशा-शहादा रस्त्यावर डामरखेडानजकी घडली. या ठिकाणीदेखील बोलेरो पीकअप (क्रमांक एमएच ०६-बीजी१९२७) वाहनातून दोन गुरे अवैधरीत्या नेली जात होती. पोलिसांनी २० हजारांची गुरे व दोन लाखांचे वाहन जप्त केले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी मिथुन शिसोदे यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सुरेश सोनवणे करीत आहेत.