धडगावमार्गे गुजरातमध्ये जाणारा ट्रकसह 89 लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:45 AM2018-02-09T11:45:03+5:302018-02-09T11:45:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/ब्राम्हणपुरी : धडगावमार्गे गुजरातमध्ये जाणारा तब्बल 71 लाख 80 हजार 800 रुपये किंमतीचा मध्यप्रदेश बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सकाळी पिंप्री, ता.शहादा शिवारात ताब्यात घेतला. नाशिक येथील भरारी पथकाने ही कारवाई केली. 17 लाखांच्या ट्रकसह एकुण 89 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सरदारलाल मांगीलाल सूर्यवंशी यास ताब्यात घेण्यात आले आहे.
मध्यप्रदेश बनावटीचे मद्य नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यात मोठय़ा प्रमाणावर विक्री होते. जिल्ह्यातील चोरटय़ा मार्गाने देखील अशा मद्याची मोठय़ा प्रमाणावर वाहतूक होते. पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळोवेळी कारवाई करून मद्यसाठा जप्त केलेला आहे. परंतु गुरुवारी पहाटे जप्त करण्यात आलेला मद्यसाठा आजर्पयतचा सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने सापळा लावून ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, मध्यप्रदेश बनावटीची आणि त्याच राज्यात विक्रीचा परवाना असलेले मद्य धडगावमार्गे गुजरातमध्ये जाणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. विभागीय उपायुक्त प्रसाद सुव्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाने बुधवार, 7 रोजी रात्रीपासून खेतिया-शहादा व शहादा-धडगाव मार्गावर सापळा लावला होता. गुरुवार, 8 रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास धडगाव रस्त्यावर पिंप्रीफाटा नजीक दहा चाकी अवजड वाहन (क्रमांक एमपी 09 एचएफ 2625) आल्यावर संशयावरून पथकाने वाहनाला थांबवून वाहनाची तपासणी केली. वाहनात मोठय़ा प्रमाणावर मद्यसाठा असल्याचे निष्पन्न झाले. ट्रक व मद्यसाठा आणि सरदारलाल सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आले.
ट्रकमध्ये बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे 90 बॉक्स त्यांची किंमत पाच लाख 61 हजार 500 रुपये. त्याच कंपनीचे 180 मि.ली.चे एक हजार दोन बॉक्स त्याची किंमत 62 लाख 52 हजार 480 रुपये. याशिवाय आठ बॉक्स त्यांची किंमत 49 हजार 920 रुपये. लीमाऊंट प्रिमीयम स्ट्राँग बिअरचे 500 मि.ली.चे 110 बॉक्स त्यांची किंमत तीन लाख 16 हजार 800 रुपये असा एकुण 71 लाख 80 हजार 800 रुपयांचे मद्य व दहा चाकी ट्रक त्याची किंमत 17 लाख रुपये असा एकुण 88 लाख 80 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई निरिक्षक एम.बी.चव्हाण, एन.बी.दहिवडे, दुय्यम निरिक्षक वाय.आर.सावखेडकर, आर.आर.धनवटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दिपक आव्हाड, विठ्ठल हाके, अमोल पाटील यांनी केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरदारलाल मांगीलाल सूर्यवंशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरिक्षक एम.बी.चव्हाण करीत आहे.