समाजकार्य महाविद्यालयाचे ९० टक्के विद्यार्थी नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 01:05 PM2020-11-27T13:05:42+5:302020-11-27T13:05:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : येथील समाजकार्य महाविद्यालयातील ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून या प्रकाराची चौकशी होऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : येथील समाजकार्य महाविद्यालयातील ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून या प्रकाराची चौकशी होऊन विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी अभाविपने कुलगुरुंकडे केली आहे.
सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मानसिकता नसताना शासन-प्रशासन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांशी खेळत होते. पण अशाही परिस्थितीत समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पदवीचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑक्टोबर २०२० मध्ये बी.एस.डब्ल्यू. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा दिल्या. परंतु विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींमुळे पदवी पूर्ण करणारे, भविष्याची दिशा आणि दशा ठरवण्याच्या वर्षात ( हेल्थ सिस्टम इन इंडिया) या एकाच विषयात समाजकार्य महाविद्यालयाचे जवळपास ९० टक्के विद्यार्थी नापास झालेले आहेत.
या विषयाची दखल घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणी दूर करून जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा यासाठी तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. या विषयाची चौकशी करून विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल विद्यापीठाने लवकर लावावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा या वेळी अभाविपचे तळोदा शहरमंत्री प्रेम माळी यांनी दिला. यावेळी अभाविपचे जिल्हा संयोजक नीलेश हिरे, ललीत देसले, राहुल पाटील, दीपक पाडवी, देवीसिंग ठाकरे, शुभम पाटील, सागर वळवी, पृथ्वीराज चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते.