कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना

By मनोज शेलार | Published: March 16, 2024 06:32 PM2024-03-16T18:32:32+5:302024-03-16T18:32:46+5:30

रस्त्याने गुरांचा कळप येत असल्याचे पाहून कार थांबविली.

A bull that escaped from the herd rammed directly into the car | कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना

कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना

नंदुरबार: रस्त्याने गुरांचा कळप येत असल्याचे पाहून कार थांबविली. कळप जवळ येताच उधळलेल्या एका बैलाने धावत जाऊन थेट कारवर चढाई केली आणि पुढील काच फोडत थेट आतच घुसला. या घटनेत डामळदा येथील उपसरपंच डॉ. विजय पाटील यांच्यासह कारमधील पाचही जण थोडक्यात बचावले. शहादा तालुक्यातील टुकी-जवखेडा गावालगत रस्त्यावर ही घटना शनिवारी घडली.

दामळदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पाटील व कुटुंबीय शहाद्याहून कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे निघाले होते. टुकी-जवखेडा गावालगत प्रवेश केला असता, समोरून गुरांचा कळप येत असल्याचे पाहून पाटील यांनी वाहन रस्त्याचा बाजूला थांबवलं. कळप हळूहळू येत असताना समोरून त्यातून एक बैल अचानक उधळला आणि धावत जाऊन तो थेट कारवर (क्रमांक जे.जी.एम. ५१५४) चढला, शिंगाने पुढील काच फोडून थेट कारमध्येच घुसला; परंतु प्रसंगावधान राखून बैल येत असल्याचे लक्षात घेताच कारमधील पाचही जणांनी लागलीच बाहेर उड्या मारल्या.

बैलाचे शीर व शरीराचा अर्धा भाग कारमध्ये, तर धड व मागील दोन पाय कारच्या बाहेर अशी स्थिती होती. महत्प्रयासाने बैलाला बाहेर काढण्यात आले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जीवितहानी टळल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान, दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. समोरून बैल उधळला असल्याचे लक्षात येताच कारमधील सर्वांना लागलीच बाहेर पडण्याचे सांगितले. क्षणाचाही विलंब न करता चारही दरवाजे उघडून आम्ही बाहेर पडलो. काही क्षणात बैलाने पुढील काचेवर धडक देत आत घुसला. कारचे नुकसान झाले; पण कुणी जखमी झाले नाही त्यातच समाधान असल्याचे डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: A bull that escaped from the herd rammed directly into the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.