नंदुरबारमध्ये पोलीस निरीक्षकाविरोधात आंदोलन करणाऱ्या आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 16:14 IST2023-02-28T16:10:53+5:302023-02-28T16:14:16+5:30
रमाकांत पाटील नंदुरबार - पोलीस ठाण्यात गेलेल्यांना अपशब्द वापरणाऱ्या पोलीस निरीक्षकाने माफी मागावी, या मागणीसाठी रास्ता रोको करणाऱ्या आमदार ...

नंदुरबारमध्ये पोलीस निरीक्षकाविरोधात आंदोलन करणाऱ्या आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हा दाखल
रमाकांत पाटील
नंदुरबार - पोलीस ठाण्यात गेलेल्यांना अपशब्द वापरणाऱ्या पोलीस निरीक्षकाने माफी मागावी, या मागणीसाठी रास्ता रोको करणाऱ्या आमदार आमशा पाडवी यांच्यासह ४० जणांविरोधात मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ फेब्रुवारी रोजी हा रास्ता रोको करण्यात आला होता.
अक्कलकुवा पोलीस ठाण्यांतर्गत बेपत्ता झालेल्या मुलीची चौकशी करण्यासाठी आलेल्या पालकांना पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत २६ रोजी सायंकाळी आंदोलन करण्यात आले होते. याअंतर्गत ५० जणांच्या जमावाने बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर ठिय्या दिला होता.
कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन झाल्याचे पोलिस प्रशासनाकडून कळवण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिस नाईक सुनील तुकाराम पवार यांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी (५०) यांच्यासह ४० जणांविरोधात मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत करत आहेत.