नवापूरात पावणे दोन लाख रुपयांची वीजचोरी; एकावर गुन्हा
By भूषण.विजय.रामराजे | Published: March 28, 2023 04:55 PM2023-03-28T16:55:41+5:302023-03-28T16:56:04+5:30
नंदुरबार : नवापूर शहरातील जीएम पार्क भागात राहणाऱ्या वीज ग्राहकाने तब्बल १ लाख ८२ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचा ...
नंदुरबार : नवापूर शहरातील जीएम पार्क भागात राहणाऱ्या वीज ग्राहकाने तब्बल १ लाख ८२ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर महिन्यात महावितरणच्या भरारी पथकाने मीटर ताब्यात घेतल्यानंतर तपासणी सुरु होती. यातून चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
नवापूरात जीएम पार्क भागात राहणारा अशपाक सत्तारभाई बेलदार या वीज ग्राहकाकडे वीज चोरी होत असल्याचे महावितरणच्या भरारी पथकाला निदर्शनास आले होते. यानुसार नोव्हेंबर २०२२ मध्ये पथकाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांनी बेलदार याच्या घरी धाड टाकून मीटर ताब्यात घेतले होते. दरम्यान मीटरची तपासणी पूर्ण करण्यात आल्यानंतर १६ हजार २४ रुपयांची वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. यातून १ लाख ८२ हजार ३२४ रुपयांची वीज चोरी झाल्याने महावितरणचे पथकप्रमुख बकुल मानवटकर यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अशपाक बेलदार याच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा नवापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.