रामपूर येथील आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी सरपंचासह दाेघांविरोधात गुन्हा दाखल
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: July 19, 2023 06:40 PM2023-07-19T18:40:55+5:302023-07-19T18:41:04+5:30
अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला.
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला. मूळ लाभार्थींऐवजी इतर लाभार्थींना घरकूल मंजूर करत रक्कम लाटण्याचा हा प्रकार आहे. मंगळवारी याप्रकरणी आमदार आमशा पाडवी यांनी रास्ता रोको केल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.तत्कालीन सरपंच कौशल्या दिलवरसिंग वळवी (४५), तत्कालीन ग्रामसेवक आनंदा ओजना पाडवी (५०) व ग्राम रोजगार सेवक शांताराम चमाऱ्या पाडवी (२८) या तिघांनी २०१९-२०२० या काळात रामपूर ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे मूळ लाभार्थी एस. जी. वळवी यांच्या नावाने आलेले १ लाख २० हजार रुपये परस्पर रामपूर येथीलच प्रतापसिंग आतऱ्या वळवी यांच्या नावावर वर्ग केले होते.
यासोबतच इतर लाभार्थींच्या अनुदानाची रक्कम अशाप्रकारे इतरांच्या खात्यात वर्ग करून काढून घेण्यात आली होती. दरम्यान तिघांनी संगनमत करून एकाच कुटुंबात दोन किंवा त्यापेक्षा अधिक जणांना लाभ दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थांकडून पंचायत समितीकडे तक्रारी देण्यात आल्या होत्या. यातून विधान परिषद सदस्य आमश्या फुलजी पाडवी यांनी मंगळवारी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत रास्ता रोको केले होते. याप्रकरणी गटविकास अधिकारी लालू जेगता पावरा यांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन सरपंच कौशल्या दिलवरसिंग वळवी (४५), तत्कालीन ग्रामसेवक आनंदा ओजना पाडवी (५०) व ग्राम रोजगार सेवक शांताराम चमाऱ्या पाडवी (२८) या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.