नवापुरात महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By भूषण.विजय.रामराजे | Published: May 12, 2023 06:31 PM2023-05-12T18:31:03+5:302023-05-12T18:32:03+5:30
धुळे ते नवापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सध्या रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.
नंदुरबार : नवापूर शहरात सुरू असलेले धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडण्याच्या उद्देशाने महामार्ग विभाग आणि कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून धक्काबुक्की करणाऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. धुळे ते नवापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सध्या रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.
गुरुवारी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीचे अभियंता अरुण कुमार मंडल, मशीन ऑपरेटर पप्पू कुमार पंडित आणि मजूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नवापूर शहर परिसरात रस्ता काम करत असताना त्याठिकाणी मनीष ओमप्रकाश अग्रवाल (४५) रा. चिंचपाडा ता. नवापूर हा आला. याठिकाणी सुरू असलेले काम बंद करण्याचे सांगून मनीष अग्रवाल याने अभियंता आणि मजूर यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान अभियंता आणि मजूर यांनी ह्या कामासोबत तुमचा काय संबंध अशी विचारणा केल्यावर मनीष अग्रवाल याने अभियंता आणि मजुरांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली होती.
यातून रस्ता निर्मितीचे सुरू असलेले काम बंद पडले होते. याप्रकरणी रात्री उशिरा यशोदीप उमेश पाटील यांनी नवापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मनीष ओमप्रकाश अग्रवाल याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ करीत आहेत.