पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमविल्याने २५ जणांविरुद्ध गुन्हा
By मनोज शेलार | Published: April 24, 2023 06:08 PM2023-04-24T18:08:49+5:302023-04-24T18:09:08+5:30
पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमवून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५ जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार : पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमवून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५ जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, २२ एप्रिल रोजी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या वादातून हा प्रकार घडला. २२ रोजी रात्री आठ वाजता २५ ते ३० जणांनी पोलिस ठाणे आवारात गर्दी केली. पोलिसांनी आमचे काहीही ऐकून घेतले नाही. आम्हाला तक्रार द्यायची आहे, असे सांगून रस्त्यावर बसून आमचाही गुन्हा नोंदवा, असे जोरजोरात ओरडून सांगत होते.
आणखी आपल्या लोकांना येथे बोलवा म्हणून चिथावणी देत होते. गुन्हा दाखल केल्यावरच आम्ही येथून उठणार, अशी भूमिका या जमावाने घेतली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आधीच जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केला आहे. असे असताना मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा प्रकार यातून घडला. त्यामुळे नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी इसमल कुसमल पावरा यांनी फिर्याद दिल्याने परवेज ऊर्फ मक्कूशेख करामत खान (४५), आरिफ कमर शेख (४०), हारून हलवाई (४५), फारूख अब्दुल गणी मेमन (४०) यांच्यासह २५ जणांविरुद्ध मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार शिंदे करीत आहेत.