मेंढ्या चारण्यासाठी बालकाला ५० हजारात विकले, दोघांविरुद्ध गुन्हा

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: September 5, 2022 06:55 PM2022-09-05T18:55:16+5:302022-09-05T18:55:23+5:30

बालकाला बाल कल्याण मंडळाकडे देऊन त्याचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

A child was sold for 50000 who feeds sheep a crime against two people | मेंढ्या चारण्यासाठी बालकाला ५० हजारात विकले, दोघांविरुद्ध गुन्हा

मेंढ्या चारण्यासाठी बालकाला ५० हजारात विकले, दोघांविरुद्ध गुन्हा

Next

नंदुरबार : अल्पवयीन बालकाला मजुरीसाठी ५० हजार रुपयात विक्री केल्याचा प्रकार एलसीबी व नंदुरबार शहर पोलिसांनी उघड करीत बालकाची सुटका केली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गुंडा नागो ठेलारी, रा.भोणे, ता.नंदुरबार व मारुती रामा सोनकर, रा.गारबर्डी, ता.बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनुसार, मध्यप्रदेशातून एका सहा वर्षी बालकाला येथील मेंढपाळाने ५० हजार रुपयात खरेदी केले होते. ही बाब पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच एलसीबी व शहर पोलिसांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. पोलीस निरिक्षक रवींद्र कळमकर व किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली चार वेगवेगळे पथके स्थापन करण्यात आली. पथकांनी शहरात व शहरालगत बालकाचा शोध घेतला. आरटीओ कार्यालयासमोर बालक मेंढ्या चारत असल्याचे समजताच कळमकर व खेडकर यांनी त्यांच्या पथकासह कोळसा डेपोजवळ धाव घेतली. त्यास प्रेमाने जवळ घेत विचारणा केली असता त्याने मारुती नामक नातेवाईकाने ठेलारीकडे दिल्याचे सांगितले. गुंडा ठेलारी यास ताब्यात घेतले असता त्याने धक्कादायक माहिती दिली. मारुती सोवकर, रा.गारबर्डी, ता.बऱ्हाणपूर याने ५० हजार रुपये घेऊन बालकाला मेंढ्या चारण्यासाठी आपल्याकडे दिल्याचे सांगितले. किरणकुमार खेडकर यांनी एक पथक गारबर्डी येथे पाठविले व मारुती सोनकर यास ताब्यात घेत नंदुरबारात आणले. त्याने देखील कबुली दिली. बालकाला बाल कल्याण मंडळाकडे देऊन त्याचे पुनर्वसन करण्यात आले आहे. गुंडा ठेलारी व मारुती सोनकर यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी सचिव हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक रवींद्र कळमकर, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक किरणकुमार खेडकर, सहायक निरिक्षक नंदा पाटील, उपनिरिक्षक प्रवीण पाटील व पथकांनी केली.

Web Title: A child was sold for 50000 who feeds sheep a crime against two people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.