तळोदा तालुक्यात मोटारसायकल अपघातात पती-पत्नी जागीच ठार
By भूषण.विजय.रामराजे | Published: April 30, 2023 04:00 PM2023-04-30T16:00:29+5:302023-04-30T16:01:04+5:30
मंगल पुंज्या पाडवी (३०) व तोरणीबाई मंगल पाडवी (२६, रा. बहुरूपा, ता. कुकरकुंडा, जि. तापी, गुजरात) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे.
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील आमलाड ते तळवे दरम्यान भरधाव वेगातील मोटारसायकल फरशी पुलावरून नाल्यात पडून झालेल्या अपघातात पती-पत्नी ठार झाल्याची घटना २८ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी मयत मोटारसायकलस्वार पतीविरोधात स्वत:सह पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मंगल पुंज्या पाडवी (३०) व तोरणीबाई मंगल पाडवी (२६, रा. बहुरूपा, ता. कुकरकुंडा, जि. तापी, गुजरात) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे.
मंगल पाडवी हा २८ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जीजे १९-क्यू ४०५९ या दुचाकीने तळवे गावाकडून आमलाड गावाकडे भरधाव वेगात जात असताना रस्त्यात असलेल्या फरशी पुलावर त्याचा वाहनावरील ताबा सुटला. वेग अधिक असल्याने मंगल पाडवी याची मोटारसायकल थेट पुलावरून नाल्यात कोसळली. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळवे, आमलाड आणि गुजरात राज्यातील बहुरूपा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
दोघेही काम आटोपून बहुरूपा गावाकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मोग्या फत्तू पाडवी यांनी तळोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत मोटारसायकलस्वार मंगल पुंज्या पाडवी याच्याविरोधात स्वतसह पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल आहे.मयत मंगल आणि तोरणीबाई यांना ९ आणि ६ वर्षे वयाच्या दोन मुली असून, अपघात घडला त्यावेळी मुली घरी होत्या. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पाडवी कुटुंबीयांकडून एकच आक्रोश करण्यात येत होता.