शहादा तालुक्यात वीजेच्या धक्क्याने मिल कामगाराचा मृत्यू
By भूषण.विजय.रामराजे | Published: April 9, 2023 11:17 PM2023-04-09T23:17:01+5:302023-04-09T23:17:37+5:30
रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वीजपुरवठा बंद झाल्याने दुरुस्तीसाठी पत्र्याच्या शेडवर चढून ते काम करत होते
नंदुरबार : शहादा तालुक्यातील चांदसैली येथील जिनिंग मिलमध्ये विजेचा धक्का लागून एका कामगाराचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी कामगार वीजवाहिनी दुरुस्त करत असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दिनेश बारकू भदाणे (४०, रा. खेतिया, मध्य प्रदेश) असे मयताचे नाव आहे. दिनेश भदाणे हे चांदसैली येथील जिनिंग मिलमध्ये कामाला होते.
रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वीजपुरवठा बंद झाल्याने दुरुस्तीसाठी पत्र्याच्या शेडवर चढून ते काम करत होते. यादरम्यान अचानक वीजप्रवाह सुरू झाला आणि दिनेश भदाणे तारेला चिकटले. यातून विजेचा जबरदस्त झटका बसल्याने त्याचा मृत्यू झाला. वीजप्रवाह बंद करून कामगारांनी त्यांना खाली उतरवून शहादा येथील रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.मयत दिनेश भदाणे हे गेल्या अनेक वर्षांपासून खासगी लाईनमन म्हणून काम करीत होते. वीजपुरवठा बंद करूनच ते दुरुस्तीचे काम करत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. यामुळे या घटनेची चाैकशीची मागणी करत कुटुंबीयांनी आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसांकडून चाैकशीचे आश्वासन मिळाल्यानंतर सुमारे सात तासांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.