पोलिसाला मारहाण करून गणवेश फाडला, तिघांविरुद्ध गुन्हा
By मनोज शेलार | Published: March 8, 2023 06:05 PM2023-03-08T18:05:02+5:302023-03-08T18:05:47+5:30
नंदुरबार - काठी, ता. अक्कलकुवा येथील होळी उत्सवाच्या ठिकाणी वाहन नेण्यास मनाई केल्याच्या रागातून तिघांनी पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करून ...
नंदुरबार - काठी, ता. अक्कलकुवा येथील होळी उत्सवाच्या ठिकाणी वाहन नेण्यास मनाई केल्याच्या रागातून तिघांनी पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करून शासकीय गणवेश फाडल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी मंगळवारी रात्री तिघांविरुद्ध मोलगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये हिराजी अनिल पाडवी (२३), अविनाश अनिल पाडवी (२१, रा. अलीविहीर, ता. अक्कलकुवा) व महेश छोटू पावरा (३२, रा. प्रिंपाणी, ता. पानसेमल) यांचा समावेश आहे. तर नाना गोरा पाडवी असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.'
पोलिस सूत्रांनुसार, काठी येथे सोमवारी रात्री होळी उत्सव होता. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता वाहनांना प्रवेशबंदी होती. त्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु हिराजी पाडवी यांनी त्यांचे वाहन थेट घेऊन जाण्यासाठी आग्रह धरला. परंतु पोलिस कर्मचारी नाना गोरा पाडवी (२९) यांनी त्यांना प्रतिबंध केला. त्यावरून त्यांच्यात वादविवाद झाला. तिघांनी पाडवी यांना मारहाण करीत त्यांचा शासकीय गणवेश फाडला, शिवीगाळ केली.
याबाबत पोलिस कर्मचारी नाना पाडवी यांनी फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध मोलगी पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणने व मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक धनराज निळे करीत आहेत.