भरधाव बसची उभ्या ट्रकला धडक; २२ प्रवासी जखमी
By मनोज शेलार | Published: January 31, 2024 05:59 PM2024-01-31T17:59:26+5:302024-01-31T18:01:58+5:30
नंदुरबार : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात एस.टी. बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. ...
नंदुरबार : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात एस.टी. बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. बुधवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. जखमींना तातडीने स्थानिक ठिकाणी उपचार करून गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नवापूर आगाराची नवापूर-पुणे बस (एमएच २० बीएल ३२०१) बुधवारी सकाळी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली.
दुपारी १२ वाजता विसरवाडी-दहिवेल दरम्यान कोंडाईबारी घाटात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. अपघातात बसची डावीकडील पुढील बाजू पूर्णपणे दाबली गेली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने लागलीच स्थानिकांनी आणि महामार्ग पोलिस पथकाने धाव घेत बचाव कार्य सुरू केले.
जखमींमध्ये प्रियंका अभयसिंग वसावे (वय २६, रा. सावरट, संयुक्ता सुधाकर वळवी (२०, रा. डोगेगाव), छायाबाई उमरसिंग वसावे (६५, रा. करंजी बुद्रुक), आशा मगन गावित (२०, रा. देवळीपाडा, ता. नवापूर) या प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच शालिनी पंतू गावित (२३) नवापूर, जस्मिता सुधाकर वळवी (२२), डोगेगाव, प्रियंका मुकेश गावित (१९) रायपूर, दीपिका सुधाकर गावित (रा. केवलीपाडा), संजय मनीष गावित (२०, रा. मोठी कडवान, ऋतिका अल्पेश वळवी (२३, रा. वसलाई), उमरसिंग भीमा वसावे (६५, रा. करंजी), हरी सोनू मावची (६०, रा. पानबारा), ममता भल्या गावित (१९, रा. बिजादेवी), विशाल दिनकर गावित (१९, रा. नानगी पाडा), रोहित नर्सिंग गावित (१९, रा. देवळीपाडा, सर्व ता. नवापूर), राहुल मोहित मोरे (३०), वैशाली राहुल मोरे (२३, दोघेही रा. नाशिक) यांच्यावर स्थानिक ठिकाणी उपचार करण्यात आले. या अपघातात बसचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात बस चालक मोबाईलवर बोलत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तसेच ज्या ट्रकवर बस आदळली तो ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला.