तळोदा येथे वाहनाच्या धडकेत तीन वर्षीय मादी बिबट ठार
By मनोज शेलार | Published: December 2, 2023 06:58 PM2023-12-02T18:58:23+5:302023-12-02T18:58:36+5:30
पंचानामा करून मृत बिबट ताब्यात घेत तळोदा येथील वन आगारात नेले.
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील खेडले ते धानोरा रस्त्यावर वाहनाच्या धडकेत तीन वर्षीय मादी बिबट ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. तळोदा वन आगारात बिबटवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
खेडले येथील गणेश पाटील, छोटू पाटील तसेच सतीश पाटील व विजय पाटील हे पहाटे मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना रस्त्यावर बिबट मेलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी लागलीच वनविभागाला याबाबतची माहिती दिली. उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील, वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, वनपाल भारती सयाईस, वासू माळी, वनरक्षक राहुल कोकणी, विरसिंग पावरा, गिरधन पावरा, जान्या पाडवी घटनास्थळी दाखल झाले. पंचानामा करून मृत बिबट ताब्यात घेत तळोदा येथील वन आगारात नेले.
तेथे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय मोलके यांनी शवविच्छेदन केले. त्यानुसार मृत बिबट ही मादी होती. वय तीन वर्ष होते. डोके व जबड्याला अज्ञात वाहनाच्या धडकेने जबर मार लागल्याने रक्तश्रावामुळे मृत्यू झाल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. याबाबत वन गुन्हा नोंदविण्यात आलेला असून शवविच्छेदन नंतर मृत बिबट प्राण्यावर तळोदा आगार येथे जाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत बिबट प्राण्याची राख तापी नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.