शेअर बाजाराच्या अमिषाने नंदुरबारच्या व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक
By मनोज शेलार | Published: June 14, 2024 08:03 PM2024-06-14T20:03:05+5:302024-06-14T20:03:21+5:30
याबाबत नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार: व्हॉट्सअप ग्रृपच्या माध्यमातून जवळीक साधत ॲपद्वारे शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवत नंदुरबारातील एका व्यापाऱ्याची ११ लाख २८ हजार ९२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनकुमार गोपीचंद मुलचंदाणी (३६) रा.गुरुनानक सोसायटी, नंदुरबार असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मुलचंदाणी हे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अभ्यास करीत होते. त्याच दरम्यान त्यांना १८ मे २०२४ रोजी जीएफएसएल सिक्युरीटी ऑफिशिअल नावाच्या व्हॉट्सअप गृपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर संबधीत गृप ॲडमीनने शेअर्स ट्रेडिंगचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ॲप डाऊनलोड करून संबधीत ॲपधारकाच्या स्टेट बॅंक खात्यात तसेच जाना स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेडच्या बॅंक खात्यात एक लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे गुंतवले.
या ॲपमध्ये एक बटन होते जे थेट येणाऱ्या आयपीओ ला लागू करते. ते बटन नेहमीच चालू असते. २२ मे रोजी मुलचंदाणी यांनी कोणतेही शेअर्स खरेदी केलेले नसतांना, मागणी केलेली नसतांना शेअर्स खरेदी झाली. त्यानुसार त्यांनी १३ लाख १८ हजार गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांना ७६ हजार ३०० व एक लाख १२ हजार ७८० रुपये शेअर्स विक्रीपोटी परत करून मोठ्या रक्कमेची गुंतवणूक करावी म्हणून आकर्षीत केले. या दरम्यान मुलचंदाणी यांच्या परिचयाच्या व्यक्तीला त्यांनी ही बाब सांगितल्यावर त्यांनी ही बाब फसवणुकीची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुलचंदाणी यांनी अडकवलेले पैेसे ॲपद्वारे काढण्याचा प्रयत्न केला असता ६ जून रोजी ते ॲपच बंद झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री मुलचंदाणी यांची झाली. इतरांचा सल्ला घेऊन त्यांनी अखेर गुरुवारी नंदुरबार उपनगर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार बनावट व्हॉट्सअपगृप आणि ॲपद्वारे ११ लाख २८ हजार ९२० रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा संबधीत व्हॉट्सअपगृप ॲडमीन, ॲप चालक, संबधीत बॅंक खातेधारक यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक शाम निकम करीत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खापर येथील हॉटेल व्यावसायिकाला देखील अशाच प्रकारे तब्बल ६७ लाखात फसविल्याचे घटना उघडकीस आली असून त्याबाबतही अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.