डाकीणच्या संशयावरून तिघांची महिलेला मारहाण, धडगाव पोलिसात गुन्हा दाखल
By मनोज शेलार | Published: March 31, 2024 04:46 PM2024-03-31T16:46:36+5:302024-03-31T16:50:05+5:30
धडगाव पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार : महिलेवर डाकीण असल्याचा संशय घेऊन गावातील एका व्यक्तीला मारले, असा आरोप करत महिलेच्या पतीला बेदम मारहाण करत गाव सोडून जाण्याची धमकी दिल्याची घटना खुंटामोडी (ता. धडगाव) येथे घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवलीबाई रणजित वळवी (४४) असे पीडित महिलेचे नाव आहे. गावातील हारसिंग कंदऱ्या वळवी व इतर दोघे हे महिलेवर डाकीण असल्याचा संशय घेत होते. सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या दरम्यान महिलेचा डाकीण असल्याचा संशयावरून छळ केला जात होता. गावातील एका व्यक्तीला जादूटोणा करून मारले, असा संशय घेतला. महिलेचा पती रणजित यांनादेखील बेदम मारहाण करण्यात आली.
गाव सोडून जावे यासाठी धमकीही दिली जात होती. या सर्व छळाला कंटाळलेल्या शिवलीबाई यांनी धडगाव पोलिस ठाणे गाठून आपबीती सांगितली. त्यांच्या फिर्यादीवरून हारसिंग कंदऱ्या वळवी (४५), पिसा पोहऱ्या वळवी (३५) व धनसिंग कंदऱ्या वळवी (४०) (सर्व रा. खुंटामोडी, ता. धडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक आर. एन. पठाण करत आहेत.