महाराष्ट्रात प्रतिबंधीत १५ लाखाचे कापसाचे बोगस बीटी बियाणे जप्त
By मनोज शेलार | Published: May 1, 2024 05:42 PM2024-05-01T17:42:56+5:302024-05-01T17:43:48+5:30
महाराष्ट्रात प्रतिबंधी कापसाचे बोगस बियाणे गुजरात मधून येणार असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.
मनोज शेलार, नंदुरबार: गुजरात मधून महाराष्ट्रात येणारे 15 लाख रुपये किंमतीचे कापसाचे बोगस बीटी बियाणे कृषी विभागाने बुधवारी खापर, ता.अक्कलकुवा येथे केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आले आहे. वाहनासह एकुण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात प्रतिबंधी कापसाचे बोगस बियाणे गुजरात मधून येणार असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. पथकाने गुजरात सिमेवरील खापर गावाजवळ पाळत ठेवली. बुधवारी दुपारी एका वाहनाची तपासणी केली असता त्यात संबंधित कंपनीचे बोगस बीटी बियाणेचे पाकीट असलेल्या गोण्या आढळून आल्या. सर्व बियाणे जप्त करून पंचनामा करण्यात आला. संबंधित बियाणे हे गुजरात मधील असून त्याला महाराष्ट्रात विक्री व वाहतूकीवर प्रतिबंध आहे. पथकाने एक हजार बियाण्यांची पाकिटे जप्त केली आहे. 15 लाखाचे बियाणे व 15 लाखाचे वाहन असा 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, यंदाच्या हंगामातील नाशिक विभागातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.