सातपुड्यात वाहन उलटून भीषण अपघात; चार बालकांचा जागीच मृत्यू
By भूषण.विजय.रामराजे | Updated: February 28, 2023 20:13 IST2023-02-28T19:20:18+5:302023-02-28T20:13:55+5:30
याठिकाणी काहींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

सातपुड्यात वाहन उलटून भीषण अपघात; चार बालकांचा जागीच मृत्यू
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भराडीपादर गावाजवळ प्रवासी वाहतूक करणारे वाहन नाल्यात कोसळून चार जण ठार तर ५० जण जखमी झाले. सोमवारी रात्री हा अपघात झाला असून रात्री उशिरा दुर्गम भागात मदत पोहाेचल्यानंतर माहिती समोर आली. सोमवारी सायंकाळी अक्कलकुवा येथून दुर्गम भागातील कटासखाई परिसरातील प्रवासी घेऊन जीजे १६ झेड ५२०१ हे वाहन निघाले होते. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असतानाही चालक भरधाव वेगात वाहन चालवत होता.
रात्री हे वाहन भराडीपादर गावाजवळ पोहोचल्यानंतर चढावावर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट नाल्यात कोसळले, यातून दिनेश हत्या वसावे (१०) विलास रमेश पाडवी (१३) विलास राजा वसावे (१४) तिघे रा. कटासखाई आणि दिनेश बाजा वसावे रा.कोटली यांचा मृत्यू झाला. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भराडीपादरचा घाटपाडा येथे घडलेल्या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ धावून गेले हाेते. मिळेल त्या वाहनांनी जखमींना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी काहींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.