अपघात प्रवण क्षेत्र व ब्लॅक स्पॉट नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 11:35 AM2019-12-07T11:35:21+5:302019-12-07T11:36:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांवरील अपघात प्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉट काढल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांवरील अपघात प्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉट काढल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरणाने काढल्याचा दावा केला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण देखील कमी झाल्याचेही या विभागांचे म्हणने आहे. दरम्यान, तीव्र अपघाताचे प्रमाण असलेले दोन्ही ब्लॅक स्पॉट कायमस्वरूपी नष्ट केले गेले आहेत.
जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण लक्षात घेता ज्या ठिकाणी जास्त अपघात होतात अशा ठिकाणी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरण यांनी असे स्पॉट शोधून त्या ठिकाणी उपाययोजना केल्या. आता जिल्ह्यात एकही ब्लॅक स्पॉट व अपघात प्रवण क्षेत्र नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
दोन ठिकाणे तीव्र क्षमतेचे
जिल्ह्यात दोन ठिकाणे ही सर्वात प्रभावी असे अपघात प्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉट असल्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यात नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील वावदनजीचा स्पॉट आणि दुसरा धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडी ते नवापूर दरम्यान असलेल्या लहान कडवान जवळील स्पॉट हे तीव्र ब्लॅक स्पॉट असल्याचे निश्चित करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता. शिवाय अनेकजण जायबंदी देखील झाले होते. आता हे दोन्ही ब्लॅकस्पॉट नष्ट करण्यात आले आहेत.
इतरही ठिकाणे धोकेदायक
जिल्ह्यातील रस्त्यांची लागलेली वाट लक्षात घेता आता जागोजागी ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. रस्त्यांवरील खड्डे चुकवितांना अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर सुरक्षेच्या व गती नियंत्रीत करण्यासाठीच्या उपाययोजना नसल्यामुळे अपघात वाढले आहेत.
नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर घोटाणे ते न्याहली दरम्यान हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नसल्यामुळे दीड वर्षात या आठ ते दहा किलोमिटर दरम्यान अनेक वेळा अपघात झाले आहेत. अशीच स्थिती अक्कलकुवा ते खापर आणि शहादा ते शिरपूर रस्त्यावरील आहे.
रस्ता सुरक्षा समिती
जिल्ह्यात होणाºया अपघातांचे शास्त्रोक्त विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, मोटार वाहन निरिक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या कामकाजाचा आढावा नुकताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी घेतला.
अपघातांचा आढावा
जानेवारी २०१८ ते आॅक्टोंबर २०१९ या काळात झालेले अपघात, अपघातातील मृत्यूमुखी व जखमी याबाबत आढावा घेवून जिल्ह्यातील सर्व ब्लॅक स्पॉटवर कार्यवाही करुन ब्लॅक स्पॉट काढल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात रस्त्यांवर ज्या पॉईटला अपघाचे प्रमाण जास्त होत असेल अशा ठिकाणी त्वरीत रस्ता दुरुस्ती, वळण दुरुस्ती अशा उपाययोजना त्वरीत करण्यात याव्यात. आपापल्या हद्दीतील झालेल्या अपघातांचा अहवाल दरमहा जिल्हास्तरीय समितीस सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी यावेळी संबधितांना दिल्या. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांनी पोलीस ठाण्याअंतर्गत गठीत केलेल्या समितीने करावयाच्या कामांबाबत सविस्तर माहिती दिली.
या बैठकीस अपर जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे कार्यकारी अभियंता वर्षा अहिरे आदी उपस्थित होते.
४जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे काम रखडले आहे. विसरवाडी ते खेतिया महामार्गाचे काम दुसºया टप्प्यात अर्थात कोळदा ते खेतिया सुरू असले तरी त्याची गती अतिशय संथ आहे. पहिल्या टप्प्याचे कामच सुरू झाले नाही.
४नागपूर-सुरत महामार्गाचे काम देखील धुळे ते नवापूर हद्दीपर्यंत बंदच आहे. या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.
४नेत्रंग-शेवाळी महामार्गाची नुसतीच घोषणा झाली आहे. कामाचा पत्ताच नाही.