शहादा-खेतिया मार्गावर अपघात सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:08 PM2018-04-16T13:08:15+5:302018-04-16T13:08:15+5:30
प्रभावी उपाययोजनेची गरज : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दिवसाआड अपघात
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 16 : शहादा-खेतिया मार्गावर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताची मालिका सुरूच असून दर दिवसाआड एक अपघात होत आहे. अपघातांची मालिका रोखण्यासाठी या रस्त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, रविवारी सुलतानपूर फाटय़ाजवळ ट्रक मोठय़ा खड्डय़ात आदळून रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
शहादा-खेतिया हा मार्ग मध्य प्रदेशाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. सुसरी धरणातून गाळ वाहतूक सुरू झाल्यापासून या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे.
शहादा-खेतिया मार्गाची सद्यस्थितीत मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाल्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अपघाताची मालिका सुरू झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून या मार्गावर प्रवास करावा लागत आहे. गेल्या 15 दिवसांपासून दररोज वाहन उलटण्याचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावर दरा फाटय़ाजवळ खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात युवक ठार झाल्याची घटना घडली. तसेच सुसरी धरणाच्या वळणाजवळ खड्डा टाळण्याच्या प्रयत्नातच ट्रॅक्टर व बसमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात चार प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
सुलतानपूर फाटय़ाजवळ 22 मार्च रोजी रिक्षा वाचविण्याच्या प्रयत्नात चिकूने भरलेला ट्रक अचानक समोर खड्डा आल्यामुळे उलटल्याची घटना घडली होती. त्यानंतर गुरुवारी ब्राम्हणपुरी गावात मोटारसायकल अचानक खड्डय़ात आदळल्याने मोटरसायकलस्वाराला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. रविवारी सुलतानपूर फाटय़ाजवळ काटरून घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एम.पी.09 एचजी- 2578) इंदूरकडे भरधाव वेगाने जात होता. अचानक रस्त्यावरील मोठय़ा खड्डय़ात ट्रक आदळला व चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो उलटला. यात चालक जखमी झाला असून ट्रकचे नुकसान झाले आहे.
या मार्गावर अपघात घडणे म्हणजे खेळ झाला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी व ज्याठिकाणी रस्ता पूर्णपणे खराब आहे तेथे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे.