विनाकारण फिरणाऱ्या ४१ वाहनधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:46 PM2020-07-25T12:46:18+5:302020-07-25T12:46:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रविवारी सकाळी नऊ ते रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरासह तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रविवारी सकाळी नऊ ते रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याने शहरात सर्व व्यवहार बंद होते. रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट होता. मुख्य बाजारपेठ व ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. तरीदेखील काही नागरिक सकाळी मोटारसायकलीने फेरफटका मारताना दिसून आले. विनाकारण फिरणाºयांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. दुपारनंतर मात्र शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.
बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची साखळी तोडण्यासाठी शहरात रविवारी सकाळपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यात रुग्ण संख्या ७० पर्यंत पोहोचली असून त्यात काहींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून नागरिक ऐकण्याच्या तयारीत नव्हते. अखेर वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस शहर पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने रविवारी संचारबंदी लागू करण्यात आली होती. औषधांची दुकाने, दवाखाने व दूध विक्री वगळता सर्वच प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. एरव्ही संचारबंदीतही हातगाड्यांवर भाजीपाला व फळे विक्री करणाºया विक्रेत्यांनीही संचारबंदीचा धसका घेत आपले व्यवसाय बंद ठेवले होते.
संचारबंदी व जनता कर्फ्यूचे आदेश असतानाही शहरात विनाकारण मोटारसायकल घेऊन फिरणाºया ४१ मोटारसायकलस्वारांवर पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व पोलीस कर्मचाºयांनी शहरातील ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. कारण नसताना फिरणाºयांना आडवून चौकशी केली जात होती. योग्य कारण असले तर सोडून दिले जात होते अन्यथा दंडात्मक कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात आली. काही अतिउत्साही नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचा प्रसादही दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ४१ वाहन चालकांकडून सुमारे २३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई वाहतूक शाखेचे कर्मचारी दादाभाई साबळे, अजय पवार, मनिंदर नाईक, तोसिफ शेख, विकास चौधरी, अतुल देसले यांच्या पथकाने केली.
प्रशासनाने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रशासनाच्या साथीने शहरात कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहादा कोरोनाचे हॉटस्पॉट होऊ नये यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले. रविवारी सकाळपासूनच महसूल, पोलीस व पालिकेच्या कर्मचाºयांचे पथक शहरातील विविध भागात फिरून जनता कर्फ्यूला साथ देण्याचे आवाहन करीत होते. या वेळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे,पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, मंडळ अधिकारी पी.बी. अमृतकर सकाळपासूनच शहरात संचारबंदीबाबत माहिती घेत रात्री उशिरापर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
शहादा शहरातील वृंदावननगरमधील ५३ वर्षीय पुरुषाचा कोरोनाचे उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात शनिवारी मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वीही कुंभारगल्लीतील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे हे दोन्ही परिसर पूर्ण सील करण्यात आले आहेत. वृंदावननगरमधील मयत रुग्ण हे मंदाणे येथील मूळ रहिवासी आहेत. मात्र त्यांचे वास्तव्य शहादा येथे होते. या मयत रुग्णाची पत्नी, मुलगा, सून व नातू यांना आधीच विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत शहरात तीन व तालुक्यातील ग्रामीण भागात चार असे सात जण कोरोनाचे बळी पडले आहेत. शनिवारी रात्री उशिरा तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हे तिन्ही रुग्ण गरीब-नवाज कॉलनीतील आहेत. त्यामुळे हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहत असून सहा दिवसात सात रुग्ण आढळून आले. पाडळदा येथेही दुसरा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे गावात जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे.