म्हसर्डी धरणाची दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:16 PM2020-05-11T12:16:40+5:302020-05-11T12:16:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : लोंढरे, ता.शहादा येथील म्हैस नदीवर म्हसर्डी धरण असून, या धरणातील पाणी आता संपुष्टात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : लोंढरे, ता.शहादा येथील म्हैस नदीवर म्हसर्डी धरण असून, या धरणातील पाणी आता संपुष्टात आले आहे. धरणातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढणे गरजेचे असून, धरणाची संरक्षण भिंत ही धोकादायक स्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या संरक्षण भिंतीचे काम त्वरित करण्यात यावे अन्यथा पावसाळ्यात धरण शंभर टक्के भरून अनुचित प्रकार घडल्यास परिसरातील आठ ते दहा गावांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोंढरे गावाच्या पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर म्हैस नदीवर म्हसर्डी धरण आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरून संरक्षण भिंती वरून पाणी वाहत होते. या संरक्षण भिंतीला ठिक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातूनदेखील पाण्याच्या प्रवाह सुरू होता. या धरणातील जलसाठ्यामुळे लगतच्या आठ ते दहा खेड्यातील शेकडो एकर जमीन ओलिताखाली येवून गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील दूर होतो. सध्य:स्थितीत धरणात पाणी नसल्याने या धरणाच्या दुरूस्तीचे काम त्वरीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
गेल्या तीन वर्षापासून धरणाच्या मुख्य बांधाच्या भिंतीतून सातत्याने गळती सुरू असून, त्यात हळूहळू प्रमाण वाढत गेले आहे. याबाबत अधिकाऱ्यांंकडे दरवर्षी लेखी तक्रार केली जाते. परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. लेखी निवेदन देऊन त्याचा उपयोग होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सद्य:स्थितीत धरणाच्या मुख्य बांधाच्या भिंतीतून पाणी गळत असल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पावसाळ्यात धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच ज्या भागाकडून सांडवा काढण्यात आलेला आहे त्या सांडव्याची भिंतदेखील निकृष्ट दर्जाची असून, या भिंतीचे नुकसान झाल्यास पाच ते सहा गावांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील सर्वच लहान-मोठे धरण काठोकाठ भरलेले होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून या धरणाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यंदा हवामान खात्यातर्फे पावसाचे प्रमाण अधिक असल्याचा अंदाज वर्तविण्यात आहे. अतिवृष्टी झाल्यास धरणात पाण्याचा अतिरिक्त दाब तयार झाल्यास भिंत फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लघुसिंचन विभागातील अधिकाºयांनी तत्काळ लोंढरे धरणाची पाहणी करून मुख्य बांधाची भिंत व दगडाची पिचिंगचे काम युद्धपातळीवर सुरू करावे अशी मागणी आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने धरणाला गळती लागत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वी धरणाच्या दुरूस्तीचे काम काढल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग स्विकारतील त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अगोदर धरणासची पाहणी करून संबंधित अधिकाºयांना सूचना द्याव्यात. तसेच धरणाची कायमची गळती थांबवून शेतकºयांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी अशीही मागणी ईश्वर माळी, उपसरपंच हिंमत रोकडे, मनोज रोकडे, राकेश माळी, धांद्रे येथील उपसरपंच चतुर पाटील यांनी केली आहे.
याकडे लघु सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी तत्काळ दखल घेऊन धरणाची दुरूस्ती करावी अशी मागणी महात्मा ज्योतिबा फुले परिषदचे कार्यकर्ते ईश्वर माळी यांनी केली आहे.