सारंगखेडा यात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:26 PM2019-12-05T12:26:00+5:302019-12-05T12:26:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सारंगखेडा, ता.शहादा येथील एकमुखी दत्त प्रभुंच्या यात्रोत्सवाला ११ डिसेंबरपासून प्रारंभ होत असून, यासाठी व्यावसायिकांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : सारंगखेडा, ता.शहादा येथील एकमुखी दत्त प्रभुंच्या यात्रोत्सवाला ११ डिसेंबरपासून प्रारंभ होत असून, यासाठी व्यावसायिकांनी जय्यत तयार करायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर मंदिर प्रशासनही भाविकांसाठी सोयीसुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाले आहे.
येथील यात्रोत्सव नवसाला पावणारे दत्त महाराज व चेतक महोत्सवासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमिवर व्यावसायिक आपापली दुकाने थाटण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
दत्त मंदिर ट्रस्टतर्फेदेखील मंदिराची डागडुजी व रंगरंगोटीचे काम करण्यात येत आहे. यात्रोत्सवात नवस फेडण्यासाठी लागणारी तुळा व्यवस्था, नारळ वाहण्याची व्यवस्था, महिला-पुरूषांसाठी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासारख्या विविध कामात मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व व्यावसायिक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या वेळी शहादा येथील अग्निबंब आणून मंदिर परिसर व गाभाऱ्यातील साफसफाई पाण्याच्या सहाय्याने करण्यात आली.
दरम्यान यात्रोत्सवाच्या कालावधीत पोलीस प्रशासनाला मदत मिळावी यासाठी सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सारंखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे उपस्थित होते. या बैठकीस पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष गजेंद्र गोसावी, सचिव सुरेशगिरी गोसावी, पोलीस पाटील सुखदेव पाटील आदींसह पोलीस पाटील उपस्थित होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सपकाळे यांनी सांगितले की, सारंगखेडा यात्रा व त्यात भरणारा चेतक महोत्सव हा भारतात प्रसिद्ध आहे. याठिकाणी लाखो भाविक व पर्यटक येत असतात. त्यासाठी पोलीस प्रशासनाला सतर्क राहून पर्यटक व भाविकांना यात्रेचा आनंद घेता यावा व शांततेत यात्रा पार पाडावी यासाठी प्रयत्न असतो. त्यामुळे पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. यात्रोत्सवा भाविक व पर्यटक हा बहुतांशी ग्रामीण भागातील असतात. पोलिसांना वेळोवेळी मदत व माहिती मिळावी यासाठी यात्रोत्सवा दरम्यान पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात येऊन पोलीस पाटील या मदत केंद्रात उपस्थित राहून सहकार्य करणार आहे. या वेळी प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी रोटेशन प्रमाणे मदत केंद्रामार्फत पर्यटक आणि भाविकांना सहकार्य करून आपली कामगिरी पार पाडावी अशी सूचना, ही देण्यात आल्या. या वेळी सारंखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरोदे यांनी सांगितले की, सारंगखेडा हद्दीतील पोलीस पाटलांची नेहमीच प्रशासनाला मदत मिळत असते. त्यामुळे सर्वांनी आपले कर्तव्य पोलीस पाटील मदत केंद्रात हजर राहून पार पाडावे अशा सूचना दिल्या. याप्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र गोसावी यांनी पाच पोलीस पाटील मिळून आपले कर्तव्य यशस्वीरित्या बजावतील व भाविकांसह पर्यटकांनाही मदत करीत यात्रोत्सवावर लक्ष ठेवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीस परिसरातील पोलीस पाटील उपस्थित होते.
सारंगखेडा येथील यात्रेचे खास आकर्षण असलेला घोडेबाजार फुल्लला असून, याठिकाणी ५०० पेक्षा अधिक घोड्यांची आवक झाली आहे. या वेळी उमदे घोडे मैदानात घोडेस्वारांसह रपेट मारताना दिसून येत आहे. घोडे बाजाराचा परिसर घोड्यांच्या टापांनी दुमदुमू लागला असून, अश्व शौकिनांची पावलेही या बाजाराकडे वळू लागल्याचे दिसून येत आहे.