दिर्घ प्रतीक्षेनंतर नंदुरबारात पावसाची रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:36 PM2018-07-17T12:36:08+5:302018-07-17T12:36:14+5:30
आतार्पयत सरासरीचा 25 टक्के पाऊस : पिकांना जीवदान, जोरदार पावसाची अपेक्षा कायम
नंदुरबार : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हाभरात पावसाची संततधार सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली होती. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. दरम्यान, जिल्ह्यात 81.45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. या पावसामुळे पिकांना जीवदान देखील मिळाले आहे.
जिल्ह्यात सरासरीचा केवळ 25 टक्के पाऊस झाला आहे. झालेला पाऊस देखील अनियमित असल्यामुळे पिकांना त्याचा काहीही फायदा होत नव्हता. परिणामी पेरणी केलेली वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. वेध शाळेतर्फे वेळोवेळी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल म्हणून इशारा दिला जात होता. परंतु जिल्हा वगळून इतरत्र पाऊस येत असल्याने शेतक:यांचे तोंडचे पाणी पळाले होते. त्यामुळे प्रत्येकालाच पावसाची आस लागून होती.
सोमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. शनिवार व रविवार सुटीचे गेल्यानंतर सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी चाकरमान्यांची कामावर जाण्याची धावपळ असतांना पावसाने रिपरिप लावल्याने जनजिवनावर परिणाम झाला होता.
सोमवारचा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधीक प्रमाणात असल्याचे चित्र होते. यामुळे मात्र दुर्गम भागातील अनेक रस्त्यांवर पाणी व चिखल यामुळे रहदारीवर परिणाम झाला.
धडगाव तालुक्यात सर्वाधिक
आतार्पयत जिल्ह्यात धडगाव तालुक्यात सर्वाधिक 37.45 टक्के तर सर्वात कमी नंदुरबार तालुक्यात अवघा 16 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे नंदुरबार तालुक्यात अद्यापही अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. अनेक शेतक:यांनी पिकांना चुहा पद्धतीने देखील पाणी देण्याचा प्रय} केला. आजच्या पावसामुळे मात्र शेतक:यांच्या जिवात जीव आला आहे. नवापूर तालुक्यात 21.83, तळोदा तालुक्यात 26.42, शहादा तालुक्यात 28.27 तर अक्कलकुवा तालुक्यात 22.68 टक्के पाऊस झाला आहे.
नदी, नाले अद्यापही कोरडे
जिल्ह्यात नदी, नाले अद्यापही कोरडेच आहेत. तापी वगळता एकही नदी अद्यापही दुथडी भरून वाहू लागली नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
81 टक्के पेरण्या
जिल्ह्यात आतार्पयत एकुण 81.45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक अर्थात 114 टक्के पेरण्या या शहादा तालुक्यात झाल्या आहेत तर सर्वात कमी 61 टक्के पेरण्या या नवापूर तालुक्यात झाल्या आहेत. नंदुरबार तालुक्यात 83.8, तळोदा तालुक्यात 68.20, धडगाव तालुक्यात 93.33 तर अक्कलकुवा तालुक्यात 63.88 टक्के पेरण्या झालेल्या आहेत.
बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडे
सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडे करण्यात आले आहे. जुलैच्या मध्याला बॅरेजचे दरवाजे उघडे करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ते पुन्हा बंद केले जात असतात. साधारणत: दोन्ही बॅरेजेस 70 ते 85 टक्के भरण्यात येत असतात. पाण्याचे लेव्हल कायम राहावी यासाठी हे बॅरेज पुर्ण क्षमतेने भरले जात नसल्याचे सांगण्यात आले.