बिबट्याचा हल्ल्यात बालकाचा मृत्युनंतर देवमोगरा परिसरातील नागरिक भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 07:34 PM2023-04-07T19:34:02+5:302023-04-07T19:34:08+5:30
अक्कलकुवा तालुक्यातील देव मोगरा पुनर्वसन शिवारात गेल्या दोन दिवसापूर्वी अचानकपणे बिबट्याने हल्ला करून एका बालकाला ठार केले
रमाकांत पाटील/नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन शिवारात बिबट्यांच्या मुक्त संचार सुरूच असून काल मध्यरात्री नंतर शेतात पाणी भरणाऱ्या दोन शेतकऱ्यांना पळवून लावल्याची घटना घडल्याने या परिसरात देखील पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील देव मोगरा पुनर्वसन शिवारात गेल्या दोन दिवसापूर्वी अचानकपणे बिबट्याने हल्ला करून एका बालकाला ठार केले असल्याची घटना घडली होती. या शिवारात दिनांक सहा एप्रिल रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास देवमोगरा पुनर्वसन येथील आपल्या शेतात सायसिंग वसावे व त्याच्या भाऊ सामानसिंग वसावे हे दोन्ही आपल्या शेतातील तिळीच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता अचानकपणे त्यांचा सामना दोन बिबट्यांशी झाला. बिबटे त्यांच्या पाठलाग करीत होते मात्र त्यांनी आरडाओरडा करत जीव मुठीत धरून तेथून पळ काढत आपली कशीबशी सुटका केली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्री फिरणाऱ्या या बिबट्यांपासून संरक्षणासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांनी गस्त घालण्याची मागणी केली जात असून या बिबट्यांना पकडण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
चौकट या परिसरातील मक्याच्या शेतात बिबट्याने अनेक कुत्र्यांना फस्त केले असून त्यांचे अवशेष जवळील मक्याच्या शेतात आढळून आले आहेत. या परिसरात शेतीसाठी रात्री विद्युत पुरवठा सुरळीत होत असल्याने शेतकरी आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरून पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. या शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत वीजपुरवठा झाल्यास हा धोका टळू शकतो याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.