रस्ते महामंडळ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:55 PM2020-11-27T12:55:04+5:302020-11-27T12:55:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहादा प्रांताधिकारी यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले. तसेच आश्वासन प्रांताधिकारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहादा प्रांताधिकारी यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले. तसेच आश्वासन प्रांताधिकारी यांनी प्रकाशा येथील शेतकरी, व्यापारी, वाहनधारकांना दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या.
सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा या दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यात प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान दोन वर्षापासून रस्त्याचे काम अपूर्ण आहे. अपूर्ण कामामुळे रस्ता पूर्णतः खराब झाला असून जागोजागी खड्डे पडून रस्त्यावर धूळ उडते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांवर धूळ उडून उत्पन्नात घट येत आहे. प्रकाशा व डामरखेडा येथील पुलावरही खड्डे पडले आहेत. या सर्व तक्रारींचे निवारण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची होती. बुधवारी सायंकाळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या कार्यालयात रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, आंदोलनकर्ते व तहसीलदार यांच्यात बैठक झाली. त्यात रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बोरसे, सहायक अभियंता वानखेडे, ठेकेदार, शेतकरी हरी पाटील, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपामध्ये मागण्या मान्य केल्या व तातडीने काम करण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकाऱ्यांना दिले. असेच आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी प्रकाशा येथील व्यापारी, आंदोलनकर्ते शेतकरी यांना दिल्यानंतर गुरुवारी होणारे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. हे सर्व रस्ते तात्काळ पूर्ण करावे, असे सांगितले. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे धुळीमुळे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. कोकणीमाता ते डामरखेडा पुलापर्यंतचा पूर्ण मार्ग डांबरीकरण करावा, प्रकाशा व डामरखेडा येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी, ज्या ठिकाणी अपूर्ण काम आहे ते तात्काळ पूर्ण करण्यात यावे, नवीन रस्ता व जुना रस्ता यामध्ये जे अंतर आहे ते व्यवस्थित करून द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. त्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत.
प्रकाशा येथे चौपदरीकरण व्हावे
कोळदा ते सेंधवा हा मार्ग काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या मार्गावरील लहान शहादे, डामरखेडा, करजई, बुपकरी, लांबोळा, मनरद या सर्वच गावांना चौपदरीकरण आहे. मध्यभागी विजेचे खांब आहेत व आजूबाजूला संरक्षक लोखंडी कठडे, गटारी आहेत. मग अशा प्रकारचा रस्ता प्रकाशा येथे का करण्यात आला नाही. प्रकाशा येथे तीर्थक्षेत्र आहे. तीन राज्य व दोन तालुक्यांना जोडणारे महत्वपूर्ण गाव आहे. भाविकांची वर्दळ असते. म्हणून प्रकाशा येथे चौपदरीकरण करणे गरजेचे असताना प्रकाशा गावाला का डावलण्यात आले? असा प्रश्न आंदोलनकर्ते व हरी पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. त्यावर या अधिकाऱ्यांनी आम्ही वरिष्ठांना विचारतो व सर्वे करण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले.