मृत कावळ्यांमुळे २४ गावांमध्ये अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 12:58 PM2021-01-25T12:58:22+5:302021-01-25T12:58:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील रायसिंगपूर येथे दोन कावळे मृतावस्थेत आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यातील रायसिंगपूर येथे दोन कावळे मृतावस्थेत आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने २४ गावांचा परिसर हा अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत कावळे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
रायसिंगपूर शिवारातील प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने येथे भेट देत कावळे ताब्यात घेतले होते. मृत कावळ्यांचे नमुने औंध येथील रोग अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. या ठिकाणाहून अहवाल येणे प्रलंबित असल्याने रायसिंगपूरसह २४ गावांना अलर्ट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत रायसिंगपूर, रांझणी, उखळ साग, घुनंशी, अंबाबारी, डीगी अंबा, नवानगर मुठा, जुनानगर मुठा, भोयरा, खापर, खटवणी, ब्राह्मणगाव, ब्रिटिश अंकुश विहीर, गलोठा, सोनापाटी, जांभीपाणी, लालपूर, काकडखुंट, शेल्टापाणी, रोजकुंड, रतनबारा, दसरापादर, भराडीपादर आणि करणपाडा या गावांतील पोलीस पाटलांना सूचना करण्यात आल्या आहेत.