जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या उद्या बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 11:36 AM2020-12-07T11:36:03+5:302020-12-07T11:36:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंगळवार, ८ रोजीच्या भारत बंदमध्ये जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सहभागी होणार आहेत. तसा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मंगळवार, ८ रोजीच्या भारत बंदमध्ये जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सहभागी होणार आहेत. तसा निर्णय घेण्यात आला असून शेतकरऱ्यांनी देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बंदला विविध संघटनांनी पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये व कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी पोलिसांनी देखील बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विषयक कायद्यांना विरोधसाठी दिल्ली येथे विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी विविध संघटना पुढे आल्या आहेत. त्याच अनुषंगाने मंगळवार, ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला पाठींबा वाढत आहे.
या काद्यात बाजार समितींच्या अस्तित्वाचा देखील प्रश्न आल्याने बाजार समितींनीही या आंदोलनाला पाठींबा देत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती बंद ठेऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत.
राज्य संघाचे आवाहन
राज्य संघाने याबाबत पत्रक काढून सर्व बाजार समितींना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांनी केंद्र शासनाने कृषि विषयक तीन कायदे पारित केलेले आहेत त्यास विरोध म्हणून विरोध देशातील विविध शेतकरी संघटना दिनांक ८ रोजी भारत देश बंद ठेवणार आहेत. या बंद मध्ये सहभागी होण्याचा संघाने निर्णय घेतलेला असून राज्यातील सव॔ कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून, शांततेच्या मार्गाने, कायदा सुविधा भंग होणार नाही याची काळजी घेवून बंद मध्ये सहभागी व्हावे. सर्व संचालक मंडळ, शेतकरी, आडते, खरेदीदार व हमाल बांधव सहकार्य करतीलच असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भारत बंद मध्ये हमाल मापाडी, माथाडी युनियन , राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे, राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे यांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्यामूळे बाजार समितीचे सर्व कामकाज बंद राहील.
शेतीमाल आणू नये
बाजार समिती मंगळवारी बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला कृषी माल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये असे आवाहन नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.
बाजाराचा दिवस
मंगळवार हा नंदुरबार व शहादा येथील बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीमाल बाजार समितीत विक्रीस आणतात. आणलेला माल विक्री झाल्यानंतर बाजारात खरेदी करून ते पुन्हा गावी परत जातात. यावेळी मात्र बाजाराच्या दिवशीच बंद चे आयोजन करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे.
विविध संघटनांचा सहभाग
मंगळवारच्या बंदमध्ये इतरही विविध संघटना सहभागी होणार आहेत. नर्मदा आंदोलन, लोकसंघर्ष मोर्चा यांच्यासह इतर संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
बंदोबस्ताचे नियोजन
जिल्ह्यात बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी पोलिसांतर्फे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात नंदुरबार व शहादा या मोठ्या शहरांचा मंगळवारी आठवडे बाजार असतो. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण राहणार आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्वच सहाही बाजार समित्या बंद राहणार असल्याने दैनंदिन व्यवहारावर परिणाम होणार आहे. नंदुरबार बाजार समिती गेल्याच महिन्यात चार दिवस बंद होती.