आघाडी, युतीच्या ‘गणिता’कडे लागले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:34 PM2019-07-01T12:34:50+5:302019-07-01T12:36:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एस.टी.प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच निवडणुकांपासून सातत्याने आमदार डॉ.विजयकुमार गावीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एस.टी.प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच निवडणुकांपासून सातत्याने आमदार डॉ.विजयकुमार गावीत हे निवडून येत आहेत. यंदा भाजपतर्फे त्यांचीच उमेदवारी जवळपास निश्चित आहे. दरम्यान, आघाडी व युती होते किंवा कसे यावर उमेदवारीचे गणित अवलंबून राहणार आहे.
आघाडी व युतीअंतर्गत नंदुरबार मतदारसंघ हा आघाडीतर्फे राष्ट्रवादीला तर युतीतर्फे शिवसेनेच्या वाटय़ाला आहे. गत निवडणुकीत युती व आघाडी नसल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना यांनी वेगवेगळी निवडणूक लढविली होती. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपतर्फे उमेदवारी केली होती. यंदा युती झाल्यास ही जागा भाजपसाठी सोडावी लागणार आहे. तर आघाडी झाल्यास ही जागा राष्ट्रवादीकडे कायम राहील. गेल्या निवडणुकीत आमदार डॉ.गावीत व काँग्रेसतर्फे कुणाल वसावे यांच्यात लढत रंगली होती. त्यावेळी डॉ.विजयकुमार गावीत यांनी जवळपास 26 हजार मतांनी विजय मिळविला होता.
लोकसभा निवडणुकीत भाजपने नंदुरबार विधानसभा मतदारसंघात जवळपास 70 हजारांचा लीड घेतला आहे. त्या अनुषंगाने भाजपला या मतदारसंघात एकतर्फी लढत राहील अशी अपेक्षा आहे. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे गणित वेगवेगळे असते.
लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळण्यावरून नाराज झालेले भाजपचे नेते डॉ.सुहास नटावदकर यांना किंवा त्यांच्या घरातील कोणास उमेदवारी मिळते किंवा कसे हे पहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे. 2009 च्या निवडणुकीत सुहासीनी नटावदकर यांनी अपक्ष उमेदवारी करीत आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना चांगली लढत दिली होती. त्याची पुनरावृत्ती होते किंवा कसे, याचीही उत्सुकता आहे.
यंदा आघाडी व युती झाल्यास उमेदवार कोण राहणार ? यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. याशिवाय काँग्रेसची भुमिका कशी राहील यावरही भाजप उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांची लढत ठरणार आहे.
पक्षनिहाय इच्छुक उमेदवार
भाजप
डॉ.विजयकुमार गावीत, डॉ.सुप्रिया गावीत, कुमुदिनी गावीत
काँग्रेस
कुणाल वसावे,रमेश गावीत, विक्रमसिंग वळवी.
शिवसेना
विरेंद्र वळवी, सुहासिनी नटावदकर, डॉ.समिधा नटावदकर
राष्ट्रवादी व इतर
राष्ट्रवादीकडून विकास वळवी तर बहुजन वंचीततर्फे डॉ.अंतर्लीकर