सातपुडय़ातील मच्छिमार संस्थांना सव्वा लाख मत्स्यबिजांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:17 PM2018-07-01T13:17:35+5:302018-07-01T13:17:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : नर्मदा काठाजवळील खर्डी खुर्द येथे पाच मच्छिमार सहकारी संस्थांना राज्यशासनाच्या मत्स्यविभागामार्फत साधारण सव्वालाख नग मत्स्यबिजाचे वाटप करण्यात आले. दरम्यान यातून साधारण 700 बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त होणार आहे.
सरदार सरोवर प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये ज्यांची घरे व जमिनी बुडाल्या आहेत अशांपैकी काहींचे पुनर्वसन झाले नाही. अशांना नर्मदा बचाव आंदोलनाने मासेमारी व्यवसाय उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यामुळे अशा विस्थापितांचा मच्छिमार संस्थांना शासनाने मत्सबीज केंद्र गेल्या तीन-चार वर्षापासून नर्मदाकाठालगत उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी मनिबेली, चिमलखेडी, ता.अक्कलकुवा व सेलगदा, चिंचखेडा, भूषा (खर्डी खुर्द), ता.धडगाव अशा पाच मच्छिमार सहकारी संस्थांना दरवर्षी मत्स्यबीज उपलब्ध करून दिली जात असते. त्यासाठी लागणारी सर्व साधन सामुग्रीदेखील संस्थांना शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यंदाही भूषा या नर्मदाकाठावरील मच्छिमार संस्थेला प्रातिनिधीक स्वरुपात जवळपास सव्वा लाख पंकज जातीचे मत्स्यबीज गेल्या शुक्रवारी देण्यास मत्स्यविभागाचे आयुक्त अरूण विंधळे यांच्या हस्ते हे बीज बेाटीवरील जलाशयात सोडण्यात आले. या वेळी त्यांनी मच्छिमार संस्थांच्या सभासदांना मार्गदर्शन करतांना सांगितले. या मत्स्य बीज उत्पादन केंद्रातून आपल्याला चांगला मासेमारीचा व्यवसाय करता येवू शकेल. यातून अनेक विस्थापित बेरोजगारांना रोजगारदेखील प्राप्त होईल. तथापि तेथील मत्स्यबीजाची चांगली काळजी घ्या. शिवाय त्यासाठीचे राखणकरणा:यांना प्रशिक्षणदेखील घ्या. रोगराईबाबत आमच्या विभागातील संबंधीत अधिका:यांशी संपर्क ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी प्रादेशिक उपायुक्त सुजाता साळुंखे, सहायक संशोधन अधिकारी डॉ.विवेक वर्तक, सहायक आयुक्त किरण पाडवी, व्ही.व्ही. नाईक, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ई.डी. सैय्यद, व्ही.अ. लहारे, नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते चेतन साळवे, मच्छिमार सहकारी संस्थांचे चेअरमन सियाराम पाडवी, नरपत वसावे, सुनील वसावे, देवाज्या पावरा आदींसह सदस्य उपस्थित होते.
शासनातर्फे नर्मदा काठावरील या गावामधील विस्थापितांची मच्छिमार सहकारी संस्थांमार्फत मत्स्यबीज उत्पादन केंद्रातून या परिसरातील साधारण 600 ते 700 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सद्या यासाठी पाच संस्था कार्यरत असल्यातरी यात वाढ करण्याचे नियोजन या पदाधिका:यांनी केले आहेत. जवळपास 15 ते 20 संस्था नोंदणी करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सियाराम पाडवी यांनी सांगितले आहे. आदर्श मत्स्यबीज संगोपनाबाबत आम्ही प्रशिक्षण घेतले आहे. इतर सदस्यांनादेखील आम्ही प्रशिक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले. शासनाच्या या मत्स्यबीज केंद्रामार्फत नर्मदा काठावरील जास्तीत जास्त बाधितांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी वेळोवेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्तेदेखील मार्गदर्शन करीत असतात. शासनाने प्रत्येक संस्थेला साधारण 48 पिंझरे दिले आहेत.