आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोहोचसाठी वेगळे पैसे कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:30 AM2021-09-11T04:30:57+5:302021-09-11T04:30:57+5:30
नंदुरबार : घरगुती स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तब्बल ९०० ते ९२० रुपयांपर्यंत सिलिंडर घरपोच मिळत ...
नंदुरबार : घरगुती स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तब्बल ९०० ते ९२० रुपयांपर्यंत सिलिंडर घरपोच मिळत आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या कंपन्या सिलिंडरसाठी ९०० रुपयांपर्यंत दर आकारात असताना वितरकांना होम डिलिव्हरीसाठी २० रुपये अधिकचे आकारण्याचे आदेश देत आहेत. यातून सिलिंडरसाठी जादा पैसे नागरिक मोजत आहेत.
गेल्या वर्षभरात एलपीजी गॅसचे दर सातत्याने वाढले आहेत. आजघडीस सिलिंडर हे साधारण ९२० ते ९४० रुपयांत नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. घरापर्यंत येणारे सिलिंडर आधीच महाग असताना त्यात घरपोच देण्याचे २० रुपये दर ठेवण्यात आले आहेत. ग्राहक म्हणून सुविधा प्राप्त असताना घरपोहोचच्या नावाने कंपन्यांकडूनही पैसे वसूल केले जात असल्याने नागरिकांमधून नाराजी आहे. वितरकांकडून येणारे सिलिंडर घरपोहोच वितरणाच्या बिलांसह येत असल्याने त्यांचाही नाइलाज असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, वर्षभरात सिलिंडरचे दर १९० रुपयांनी वाढले आहेत. जानेवारी २०२१ मध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर ७०७ रुपयांना मिळत होते. यात फेब्रुवारी महिन्यात ७५, मार्च महिन्यात ५०, जुलै व ऑगस्ट महिन्यांत प्रत्येकी २५ रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात १० रुपयांची दरकपात झाली होती. जून महिन्यात मात्र केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारे दरवाढ केली नव्हती. परंतु, तीन महिन्यांपासून सातत्याने दरवाढ सुरू आहे.
सिलिंडरचा पुरवठा शहरात गेल्या काही काळात नियमित सुरू झाला आहे. यातून घरपोच सिलिंडर देण्यात सर्वच एजन्सीधारक पुढे आहेत. यातून कंपन्यांच्या दरानुसार वाढीव १२ ते २० रुपये होम डिलिव्हरीची आकारणी केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात ग्राहकांच्या खात्यावर येणारी सबसिडीही बंद झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
घरपोच सिलिंडर पोहोचते करण्यात आल्यानंतर काहींकडून १० ते २० रुपयांची मागणी व्हायची, परंतु बिलात नसल्याने ते कधी दिले नाहीत. कंपन्यांनीही अशा प्रकारे पैश्यांची आकारणी बंद करावी.
-करुणा पाटील, नंदुरबार.
सिलिंडर न परवडण्यासारखे झाले आहे. दर महिन्याला नवीन दर असतात. पूर्वी घरापर्यंत सिलिंडर आणून देणाऱ्याला १० रुपये स्वखुशीने देत होतो. आता मात्र ते देणे बंद केले आहे. सिलिंडरचे दर कमी झाले पाहिजेत.
- शोभा पवार, नंदुरबार.
कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या दरांनुसार कामकाज सुरू आहे. वितरणासाठी कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या बिलातच घरपोच करण्याचे दर ठरविण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचे जादा पैसे आकारणी केली जात नाही.
- भरत चलियावाला,
नंदुरबार गॅस कंपनी,