ट्रकसह 44 लाखांचा मद्यसाठा आमलाडला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:56 AM2018-06-14T11:56:25+5:302018-06-14T11:56:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरामध्ये अवैधरित्या जाणारा मद्याचा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला. ट्रकसह एकुण 44 लाख 44 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातून गुजरातकडे अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर सापळा रचला. आमलाड, ता.बोरद येथे ट्रक (क्रमांक एम.पी.09-एच.जी.6285) येताच पथकाने ट्रक थांबविला. झडती घेतली असता त्यात मोठय़ा प्रमाणावर मद्याचा साठा आढळून आला. पथकाने ट्रक नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयात आणला. तेथे दिवसभर ट्रकमधील मद्याची मोजणी सुरू होती. सायंकाळी मोजणी आटोपली. ट्रकमध्ये बॉम्बे स्पेशल व्हिस्की, टिटानियम व्होडका, गोवा व्हिस्की, किंगफिशर बिअर, माऊंट बिअर असे एकुण 705 खोके मद्यसाठा आढळून आला. त्याची किंमत एकुण 34 लाख 11 हजार 860 रुपये इतकी आहे. ट्रकसह एकुण 44 लाख 44 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई भरारी पथकाचे निरिक्षक अविनाथ घरत, निरिक्षक प्रकाश गौडा, सितनाका निरिक्षक अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरिक्षक सुभाष बाविस्कर, मनोज संबोधी, शैलेंद्र मराठे, जवान हंसराज चौधरी, धनराज पाटील, भुषण चौधरी, भट्टाचार्य बागले, हितेश जेठे, हेमंत पाटील, मानसिंग पाडवी यांच्या पथकाने केली. तपास निरिक्षक अविनाश घरत करीत आहे.