नंदुरबारच्या ऑईल मिल चालकाने केली तब्बल १९ लाखांची वीजचोरी
By मनोज शेलार | Published: April 6, 2023 05:29 PM2023-04-06T17:29:08+5:302023-04-06T17:30:11+5:30
महावितरणच्या भरारी पथकाने अचानक तपासणी केली असता, २६ महिन्यात एक लाख १० हजार ६४३ युनिट वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले.
नंदुरबार : नवापूर येथील ऑईल फॅक्टरी चालकाने तब्बल १९ लाख ५६ हजारांची वीजचोरी केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ महिन्यात वीजचोरी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवापूर येथील सुदरपूर रोडवर इस्माईल ऑईल फॅक्टरी आहे. फॅक्टरीचे चालक इंद्रीसभाई रज्जाक खाटीक यांनी त्यांच्या मिलमध्ये अवैधरीत्या वीज घेतली.
महावितरणच्या भरारी पथकाने अचानक तपासणी केली असता, २६ महिन्यात एक लाख १० हजार ६४३ युनिट वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले. या विजेची एकूण रक्कम १९ लाख ५६ हजार ४० रुपये इतकी झाली होती. महावितरणने तडजोड रक्कम तीन लाख सहा हजार व वीजचोरीची रक्कम १९ लाख ५६ हजार ४० रुपये मिळून एकूण २३ लाख १६ हजार ४० रुपयांचे बिल त्यांना दिले. परंतु इंद्रीसभाई खाटीक यांनी दिलेले ते बिल देखील भरले नाही. त्यामुळे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बकूळ रामदास मानवटकर यांनी फिर्याद दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.