सारंगखेडा पर्यटन हब व प्रकाशा, तोरणमाळ विकासाच्या घोषणा हवेतच विरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:22 AM2021-01-13T05:22:24+5:302021-01-13T05:22:24+5:30
नंदुरबार : सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन हब करायचे आणि प्रकाशा तीर्थक्षेत्र व तोरणमाळ पर्यटन केंद्राचा चेहरामोहरा बदलायची घोषणा ...
नंदुरबार : सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन हब करायचे आणि प्रकाशा तीर्थक्षेत्र व तोरणमाळ पर्यटन केंद्राचा चेहरामोहरा बदलायची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पर्यटनमंत्री जयपाल रावल यांनी केली होती. परंतु सरकार बदलले आणि सर्व घोषणाही हवेतच विरल्याची स्थिती आहे. चेतक फेस्टिव्हलला निधीदेखील देण्यास बंद केल्याचे गेल्यावर्षी स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे पुन्हा उपेक्षित राहिली आहेत.
सारंगखेडा येथील पहिल्या चेतक फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी अर्थात चार वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींचा लवाजमा सारंगखेडा येथे दाखल झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांनी विविध घोषणा केल्या होत्या. त्यामुळे जिल्हावासीयांना पर्यटनस्थळाचा आणि धार्मिक क्षेत्राचा विकास होईल अशी आशा लागली होती. परंतु सतत तीन वर्ष मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलला हजेरी लावून गेले, कार्यवाही मात्र पुढे सरकली नाही. त्यानंतर गेल्यावर्षी सरकार बदलले आणि चेतक फेस्टिव्हलचा निधी देणे बंद झाले. केलेल्या घोषणाही कागदावरच राहिल्या.
..काय होत्या घोषणा
सारंगखेडा यात्रेत घोडे खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होते. देशभरातील नामवंत घोडे, विविध प्रजातींचे घोडे येथे विक्रीस येतात. ही बाब लक्षात घेता सारंगखेडा येथे अश्व प्रजनन केंद्र व अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखाना स्थापन करण्यात येणार होता. देशभरातील घोड्यांच्या प्रजातींचे संशोधन व प्रजननसंदर्भात येथे काम होणार होते. त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली होती. अश्व प्रजनन केंद्राचे आणि अश्व संग्रहालयाचेे प्राथमिक स्ट्रक्चरदेखील तयार झाले होते. निधी देऊन ते काम सुरू होणार तोच राज्यातील सरकार बदलले आणि हा प्रोजेक्ट फाइलबंद झाला.
याच ठिकाणी तापीवर मोठे बॅरेज आहे. सारंगेखडा ते प्रकाशा या दोन बॅरेजच्या पाण्यामुळे तापी बारमाही भरलेली असते. त्याचा उपयोग करून येथे जलपर्यटनाला वाव देऊन जलक्रीडेचे विविध साहित्य आणण्याचे ठरले. नाशिक येथील गंगापूर धरणात असलेल्या एमटीडीसीच्या बोटी येथे दाखल झाल्या; परंतु यात्रेनंतर त्या एकाजागी बांधून ठेवण्यात आल्या. आता त्या पुन्हा गंगापूर धरणात गेल्या.
सारंगखेडाप्रमाणेच दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्राचादेखील विकास करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. परंतु तोही कागदावरच राहिला. प्रकाशा केवळ तीर्थक्षेत्र विकास निधीतून तोकडा निधी मिळून त्याद्वारे कामे केली जात आहेत.
तोरणमाळ येथील पर्यटन केंद्राचा विकासदेखील पुढे सरकू शकला नाही. येथील रोपवे, पॅराग्लायडिंग, इको टुरिझम, हेलिकॅाप्टर राइड या घोषणा स्वप्नवत होत्या व अद्यापही स्वप्नच बनून राहिल्या आहेत.
नवीन सरकारने तरी यातील काही प्रस्तावांच्या फाइलींवरील धूळ झटकावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांची आहे.