उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का: विधानपरिषदेचा आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, दोन दिवसांत प्रवेश?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 09:11 PM2024-03-16T21:11:52+5:302024-03-16T21:14:44+5:30
उद्धव ठाकरे समर्थक आणखी एक आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत आहे.
Shivsena UBT Uddhav Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षांतरालाही वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे समर्थक आणखी एक आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत आहे. विधानपरिषद निवडणुकीत ज्या आमदाराला निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपली ताकद पणाला लावली होती तेच आमश्या पाडवी हे आता पक्ष सोडणार असल्याचं बोललं जात आहे.
आमश्या पाडवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून पुढील दोन दिवसांत ते आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करतील, असे समजते. आमश्या पाडवी यांनी खरंच पक्षांतर केल्यास तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.
दरम्यान, आमदार आमश्या पाडवी यांनी पक्षांतराबाबत अद्याप अधिकृतरित्या कसलंही भाष्य केलं नसून ते नक्की काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आमश्या पाडवी यांचा राजकीय प्रवास
नंदुरबार जिल्ह्यातील आमश्या पाडवी यांची आदिवासी नेते अशी ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. २०२२ मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी आमशा पाडवी यांना विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ते विजयीही झाले होते. मात्र हेच आमश्या पाडवी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.