मुलाचा ताबा घेण्यावरून विभक्त पती-पत्नीत वाद, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By मनोज शेलार | Published: April 13, 2023 07:07 PM2023-04-13T19:07:18+5:302023-04-13T19:07:32+5:30
नवापूर येथील कुंभारवाडा भागात राहणाऱ्या जागृती दिलीप मोरे (३०) व त्यांचे पती हे विभक्त राहतात.
नंदुरबार - मुलाचा ताबा घेण्यावरून विभक्त पती-पत्नीमध्ये वाद होऊन महिलेला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना नवापूर येथे घडली. याप्रकरणी भुसावळ, जि. जळगाव येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर येथील कुंभारवाडा भागात राहणाऱ्या जागृती दिलीप मोरे (३०) व त्यांचे पती हे विभक्त राहतात. त्यांच्यात मुलाच्या ताब्यावरून वादविवाद आहेत. त्याच वादातून भुसावळ येथे राहणारे सचिन चित्ते व त्यांचे दोन नातेवाईक नवापूर येथे आले. त्यांनी जागृती मोरे यांच्या घराबाहेर आरडाओरड केली. त्यामुळे जागृती यांनी दरवाजा उघडला असता तिघांनी जबरीने घरात प्रवेश केला. त्यांनी जागृती यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तुटून गहाळ झाली.
शिवाय त्यांची बहीण रंजना यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व दोन ग्रॅमचे मंगळसूत्र झटापटीमध्ये गहाळ झाले. याबाबत जागृती दिलीप मोरे यांनी फिर्याद दिल्याने सचिन आनंदा चित्ते (३५), अमोल आनंदा चित्ते (३२) व आनंदा चिंधा चित्ते (६५) यांच्याविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार दादाभाई वाघ करीत आहेत.