लग्नात नाचण्याच्या वादातून शहाद्यात हाणामारी, १३ जणांना अटक
By मनोज शेलार | Published: April 26, 2023 06:09 PM2023-04-26T18:09:01+5:302023-04-26T18:09:23+5:30
लग्नात नाचताना धक्का लागला या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली.
नंदुरबार : लग्नात नाचताना धक्का लागला या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारी लाठ्याकाठ्यांचा उपयोग करण्यात आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला याप्रकरणी १३ संशयितांना अटक केली आहे.
शहरातील टेक भिलाटी परिसरात मंगळवारी लग्न होते. या लग्नासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक मंडळी जमली होती. लग्नासाठी बॅन्ड आणण्यात आला होता. शहरातील अब्दुल हमीद चौकात लग्नाची वरात आली असताना बॅन्डच्या तालावर वऱ्हाडी मंडळी सह नातेवाईक नाचत असताना एकाचा धक्का दुसऱ्याला लागला. यावरून सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्यानंतर परिसरात पळापळ झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले. पोलिसांनी यानंतर लागलीच कारवाईला सुरुवात करत मंगळवारी रात्री उशिरा चार संशयितांना अटक केली होती. तर बुधवारी सकाळी उर्वरित नऊ संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले.
रात्री दोन वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यावर जबाब जमला होता पोलिसांनी जमावाला पांगविले घटना घडली त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
याप्रकरणी शहादा पोलिसात पोलिस कर्मचारी दिनकर रामा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून जाकीर शाबीर पठाण (४०), मोईन पिंजारी (३५), मोना (३२), बिलाल सत्तार मिस्तरी (३३), नविद खान (४३), सद्दाम (४१), परेश गोरख पवार (३७), कार्तिक दिलीप नाईक (२४), वेडू कुवर (३७), पप्पू सामुद्रे (३१), सुलतान शाह (२७), सुलतान कुरेशी (२९), समीर शहा (२४) सर्व रा. शहादा व इतर ५ ते ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहेत.